झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:16 PM2021-09-18T23:16:02+5:302021-09-18T23:16:33+5:30
Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे.
रांची - झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना बालूमाथ ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. (Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand )
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गावामध्ये करमा पूजन झाल्यानंतर गावातील लोक करमा विसर्जन करण्यासाठी तलावात गेले होते. त्यावेळी तलावात आंघोळ करत असताना सात मुली खोल पाण्यात गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केला. तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी तलावात उड्या घेत तीन मुलींना बाहेर काढले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गावकरी चार मुलींना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्यावतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लातेहारच्या डीसींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सात मृत मुलींमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, लातेहार जिल्ह्यातील शेरेगाडा गावामध्ये करम डाली विसर्जनादरम्यान ७ मुलींचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. ईश्वराने दिवंगत मुलींच्या आत्म्याला शांती प्रदान करावी. या दु:खाचा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो.