सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक
By admin | Published: November 7, 2016 10:41 PM2016-11-07T22:41:07+5:302016-11-07T22:40:06+5:30
युरोप आणि आफ्रिकेतील सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याचं वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - युरोप आणि आफ्रिकेतील सात भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्स हॅक करण्यात आल्याचं वृत्त आहे. ट्विटरवर Kapustkiy आणि Kasimierz L या हॅंडलवरून हॅकर्सनी दक्षिण आफ्रिका,लीबिया, मलावी, माली, इटली, स्वित्झर्लंड आणि रोमानिया येथील भारतीय दूतावासाची अधिकृत वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला आहे. 'याबाबत माहिती मिळाली असून, समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील 161 भारतीय नागरिक, स्वित्झर्लंडमध्ये राहणारे 35, इटलीमधील 145 भारतीय, लीबियामध्ये राहणारे 305, मलावी येथे राहणारे 74, माली येथे राहणारे 14 आणि रोमानियातील 42 भारतीय नागरिकांबाबत महत्वाची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.
'भारतीय दूतावासांच्या वेबसाइट्सची सुरक्षा अत्यंत कमकुवत असून भारतीय दूतावासाला चांगल्या सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. अन्य भारतीय दूतावासांच्या वेबसाईट्सही सुरक्षित नाहीत, एखादा 6 वर्षांचा मुलगाही भारतीय दूतावासाच्या वेबसाईट हॅक करू शकतो', असा दावा Kapustkiy नावाच्या एका हॅकरने केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.