अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:09 PM2024-01-21T20:09:53+5:302024-01-21T20:11:31+5:30
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराबाबत माहिती दिली आहे.
अयोध्येतील राम मंदिरात उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. सोहळ्यापूर्वी संपूर्ण देश राममय झाला आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वीची तयारी पूर्ण झाली असून आता रामलला त्यांच्या भव्य मंदिरात कधी विराजमान होणार या क्षणाची देश वाट पाहत आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर बांधकामाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले, २३ जानेवारीपासून पुन्हा नव्या उत्साहाने आणि बांधिलकीने कामाला सुरुवात होईल, जेणेकरून मंदिराचे बांधकाम २०२४ मध्येच पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पुन्हा कामाला सुरुवात होईल. सोमवारी दुपारी १२.३० वाजता रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच व्यवसायात तेजी! आतापर्यंत एक लाख कोटींचा बिझनेस
मिश्रा म्हणाले की, राम मंदिर परिसरात आणखी सात मंदिरे बांधली जातील. ही मंदिरे सामाजिक समरसतेचे प्रतिक असतील. अभिषेक झाल्यानंतर त्यांचे बांधकाम सुरू होईल.
२.७ एकर जागेवर नगारा शैलीत राम मंदिर बांधण्यात आले आहे. हे तीन मजली मंदिर आहे त्याची लांबी ३८० फूट (पूर्व ते पश्चिम) आणि २५० फूट रुंदी आहे. याशिवाय मंदिराची उंची १६१ फूट आहे. या मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या विधीत डोमराजांच्या कुटुंबासह विविध विभागातील १४ जण सहभागी होणार आहेत. १६ जानेवारीलाच प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला होता. यजमानांच्या यादीत उदयपूरचे रामचंद्र खराडी, आसामचे राम कुई जेमी, जयपूरचे गुरुचरण सिंग गिल, मुलतानीचे रमेश जैन, तामिळनाडूचे अलरासन आणि महाराष्ट्राचे विठ्ठल राव कमनेले यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील महादेवराव गायकवाड. लखनौ येथील दिलीप वाल्मिकी, डोमराजाच्या कुटुंबातील अनिल चौधरी आणि काशी येथील कैलाश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.