राजकोटमध्ये ७२ तासांत हृदयविकाराने सात जणांचा मृत्यू, वाढत्या आकडेवारीमुळे लोकांमध्ये घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:21 IST2025-02-05T12:20:12+5:302025-02-05T12:21:41+5:30
राजकोटमध्ये ७२ तासांत हृदयविकाराच्या झटक्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राजकोटमध्ये ७२ तासांत हृदयविकाराने सात जणांचा मृत्यू, वाढत्या आकडेवारीमुळे लोकांमध्ये घबराट!
गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकोटमध्ये ७२ तासांत हृदयविकाराच्या झटक्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय कोठारिया, गांधीग्राम, शापेर आणि वेरावळ येथूनही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
बेलनाथपारासह अनेक भागात हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. हृदयविकारामुळे होणारे बहुतेक मृत्यू ५० ते ६० वयोगटातील लोकांचे झाले आहेत. तर, मृतांपैकी एकाचे वय ३५ वर्ष आहे. दरम्यान, सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे आणि मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत.
राजकोट शहराबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या ७२ तासांत शहरात हृदयविकाराच्या झटक्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक लोक ५० ते ६० वयोगटातील होते. पाच पुरुष आणि एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृतांपैकी शैलेश बरैया हे ३५ वर्षांचे होते.
शैलेश बरैया यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. दरम्यान, राजकोटमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सात जणांचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. लोक लहान वयातही हृदयविकाराच्या घटनांबद्दल चिंतित होऊ लागले आहेत.
अलिकडेच गुजरातमधील अहमदाबाद येथील जेवार शाळेत एका आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ती मुलगी तिच्या वर्गाकडे जात असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले आणि ती कॉरिडॉरमधील एका बाकावर बसली. त्यावेळी मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर ती बेंचवरून खाली कोसळली.
या प्रकरणांमध्ये आरोग्य तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, फास्ट फूडच्या युगात आपली जीवनशैली बदलली आहे, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढला आहे. ही समस्या केवळ आपल्या राज्यापुरती किंवा देशापुरती मर्यादित नाही. तर जगभरातील ६.४ कोटींहून अधिक लोक हृदयविकाराने ग्रस्त आहेत, असे आकडेवारीतून समजते.