राज्यसभा निवडणुकीमध्ये सात राज्यांत ‘मनीपॉवर’ !
By admin | Published: June 8, 2016 03:10 AM2016-06-08T03:10:46+5:302016-06-08T03:10:46+5:30
कर्नाटक राज्यसभा निवडणुकीतील लाचखोरीचे स्टिंग आॅपरेशन गाजल्यानंतर तेथील निवडणूक रद्द करण्यासाठी दबाव वाढला
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- कर्नाटक राज्यसभा निवडणुकीतील लाचखोरीचे स्टिंग आॅपरेशन गाजल्यानंतर तेथील निवडणूक रद्द करण्यासाठी दबाव वाढला असताना आणि निवडणूक आयोगाला निर्णय घेणे अवघड ठरले असताना अन्य सहा राज्यांमध्येही निवडणुकीत धनशक्तीचा बोलबाला आहे.
कर्नाटकमधील स्टिंगमुळे अन्य राज्यांतील उमेदवार सावध बनले असले तरी पैशाचा बोलबाला पाहता स्थिती वेगळी नाही. स्टिंगसंबंधी आरोपांबाबत निवडणूक आयोगाने अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. पुरावे नसल्यामुळे निवडणूक आयोगाला या राज्यातील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेणे अवघड ठरेल, असे कायदेतज्ज्ञांना वाटते. राजकीय पक्षांनी उद्योगपती व श्रीमंत उमेदवारांना अपक्ष म्हणून तिकिटे दिल्यामुळे आयोगाने उर्वरित राज्यांमधील प्रक्रियेवरही बारीक निगराणी ठेवण्याचे काम चालविले आहे.
>भाजपाकडून शह-काटशहाची खेळी...
भाजपाला झारखंड आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक तर मध्य प्रदेशात दोन जागा जिंकता येतील, मात्र या पक्षाने या तिन्ही राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार उभे करीत काँग्रेसला शह दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमोच्या बसंत सोरेन यांना भाजपाच्या महेश पोद्दार यांनी आव्हान दिले आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसचे कपिल सिब्बल यांच्या पराभवासाठी भाजपाने कंबर कसली असून प्रीती महापात्रा यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे विवेक तनखा यांच्यासमोर भाजपाने विनोद गोटिया तसेच प्रदीप ताम्टा यांच्याविरुद्ध गीता ठाकूर यांना उमेदवारी देत आव्हान दिले आहे.
नऊ राज्यांमधून ३२ उमेदवार राज्यसभेवर अविरोध गेले असले तरी ७ राज्यांमधील २६ जागांचे भवितव्य ११ जून रोजी मतदानानंतर निकाल घोषित होईल तेव्हाच कळणार आहे.
हरियाणात भाजपाने माध्यमसम्राट सुभाषचंद्रा यांना खुला पाठिंबा जाहीर केला आहे. आयएनएलडीने आर.के. आनंद यांना समर्थन जाहीर केले असले तरी या पक्षात बंडाच्या कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या जागेसाठी होणाऱ्या काट्याच्या लढतीमुळे साहजिकच आमदारांचे भाव वधारले आहेत.
> उमेदवार अधिक असल्याचा परिणाम
एकीकडे कर्नाटकची निवडणूक गाजू लागली असून हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि झारखंड या अन्य सहा राज्यांमधील स्थितीही व्यथित करणारी आहे. कर्नाटकमध्ये दोन जागा निवडून येण्याची शक्यता असताना काँग्रेसने के.सी. राममूर्ती यांच्या रूपाने तिसरा उमेदवार उभा करीत एका जागेची भूक दाखविली आहे.
जद (एस) चे उमेदवार बी.एम. फारूक यांना जागा जिंकण्यासाठी केवळ चार मतांची गरज असल्याने चुरस वाढली. राजस्थानमध्ये काँग्रेसने उद्योगपती कमल मोरारका यांना समर्थन देत
एका जागेचा डाव खेळला आहे.
मोरारका यांना ४१ मते हवी असताना काँग्रेसकडे केवळ २४ मते आहेत. भाजपाला या राज्यात चार जागांवर विजयासाठी १६४ मतांची गरज आहे, तरीही काँग्रेसने संधी मिळविण्याची तयारी केली आहे. भाजपाने पाच राज्यांमध्ये अपक्ष उमेदवार उभे करीत त्याचा बदला घेतला आहे.