सात हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळली
By admin | Published: March 29, 2016 01:40 AM2016-03-29T01:40:26+5:302016-03-29T01:40:26+5:30
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.
केंद्रीय विद्युत मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षात ७,0१२ गावांत वीज पोहोचविण्यात आली आहे.
आणखी ११,४४0 गावे विजेविना आहेत. त्यापैकी ७,८४३ गावांना ग्रीडच्या माध्यमातून वीज पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ३,१४८ गावांना आॅफ-ग्रिड वीज पोहोचविली जाणार आहे.
दूरवर्ती आणि डोंगराळ असल्यामुळे या भागांत ग्रीड पोहोचलेले नाही. त्यामुळे आॅफ-ग्रीड वीज पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४४९ गावांत
राज्य सरकारांना वीज
पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, एप्रिल ते आॅगस्ट २0१५ या काळात १,६५४ गावांत वीज पोहोचविण्यात आली. आॅगस्ट ते मार्च या काळात आणखी ५,३५८ गावांत वीज पोहोचविण्यात आली.
विद्युतीकरणावर सरकारचे खास लक्ष होते. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ग्रामविद्युत अभियंत्यांकडून कडक निगराणी केली जात होती. प्रत्येक महिन्याला नियमितपणे प्रगतीचा आढावाही घेतला जात होता. आवश्यकता वाटल्यास अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या. (वृत्तसंस्था)