शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

By मोरेश्वर येरम | Published: December 2, 2020 11:17 AM2020-12-02T11:17:47+5:302020-12-02T11:20:10+5:30

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला.

Several former sportspersons to return Padma Shri Arjuna awards in support of protesting farmers | शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

Next
ठळक मुद्देमाजी खेळाडूंनी दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबायेत्या ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनासमोर पुरस्कार ठेवून खेळाडू व्यक्त करणार निषेधशेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, लाठीचार्जचा व्यक्त केला निषेध

दिल्ली
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता माजी खेळाडूंचाही पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार परत देण्याची घोषणा माजी खेळाडूंनी केली आहे. शेतकऱ्यांना जर अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करायचं? शेतकऱ्यांच्या विरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून याचा आम्ही विरोध करतो, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे. खेळाडूंच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे सरकारने विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. आज सलग सातव्या दिवशी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोवर कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या माजी खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबिर कौर यांचा समावेश आहे. या खेळाडूंसह आणखी काही खेळाडूंनी सरकारला ५ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर येत्या ५ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर आपल्याला मिळालेले पुरस्कार ठेवून ते परत देण्याचा इशारा या खेळाडूंनी दिला आहे. 

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ''आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते अतिशय शांत पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहेत. हिंसा झाल्याची एकही घटना समोर आली नाही. पण ते दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, अश्रूधुराचा वापर करण्यात आला हे अतिशय निंदनीय आहे. जर आपल्या वडीलधारी व्यक्तींना अशी वागणूक मिळणार असेल तर आमचे पुरस्कार काय कामाचे? त्यामुळे हे पुरस्कार आम्ही परत करण्याचा निर्णय घेतला आहे", असं साजन सिंग चीमा म्हणाले. साजन सिंग हे पंजाब पोलीस दलात पोलीस अधिकारी देखील राहीले आहेत. 

शेतकऱ्यांना जर हे नवे कायदे नको असतील तर मग केंद्र सरकार ते लादण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल देखील साजन सिंग यांनी यावेळी उपस्थित केला. याशिवाय हरियाणातील माजी खेळाडूंनाही या आंदोलनात सामील करुन घेण्यासाठी संपर्क साधत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Web Title: Several former sportspersons to return Padma Shri Arjuna awards in support of protesting farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.