मोदींच्या सभेत चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:28 PM2019-02-02T15:28:32+5:302019-02-02T15:28:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोदींच्या येथील सभेला बंगाली नागरिकांनी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे सभेच्याठिकाणी गोंधळ उडाला. तर काहीवेळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मोदींनीही अर्ध्यातूनच आपलं भाषण बंद केलं. या चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थितीत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीपश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या, हे मला आता समजलं.
आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मात्र, मोदींनी आपले भाषण आवरतं घ्यावं लागला. गर्दीमुळे सभेच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर, या घटनेट काही महिला आणि लहान मुले जखमी झाल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले.
मोदींची सभा सुरू झाल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन सभा ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी आहे त्या जागेवर बसूनच सभा ऐकण्याचं आवाहन केलं होतं. विशेषत: महिलांना उद्देशून मोदींनी हे आवाहन केलं होतं. मात्र, चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येताच मोदींनी भाषणासाठी पुढील ठिकाणी जायचं असल्याचं सांगत आपलं भाषण मध्येच बंद केलं. दरम्यान, जखमी महिला आणि मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
PM Modi in Durgapur,West Bengal: There was a lot of enthusiasm during my rally in Thakurnagar, and I think the ground was filled twice its capacity,I would like to apologise for the discomfort the people went through; Visuals of those injured during the rally (Pic 2&3) pic.twitter.com/SlhflpfeDj
— ANI (@ANI) February 2, 2019