अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगल्याचे भाडे थकवले, आरटीआयमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 16:35 IST2019-05-19T16:33:16+5:302019-05-19T16:35:32+5:30
ही थकबाकी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तूंबाबत आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार नकवी आणि सिंह यांच्यावर प्रत्येकी 1.46 लाख आणि 3.18 लाख रुपयांची थकबाकी आहे.

अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगल्याचे भाडे थकवले, आरटीआयमधून खुलासा
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवस शिल्लक राहिले असताना नगरविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगल्याचे भाडे थकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सितारामन, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकारी बंगल्याचे भाडे थकविल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने केंद्रीय नगरविकास खात्याला मागविलेल्या माहितीमधून हे उघडकीस आलं आहे. विभागाच्या उत्तरात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही थकबाकी ठेवल्याचं सांगितले. ही थकबाकी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तूंबाबत आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार नकवी आणि सिंह यांच्यावर प्रत्येकी 1.46 लाख आणि 3.18 लाख रुपयांची थकबाकी आहे.
आरटीआय कार्यकर्ते अजीत कुमार सिंह यांनी नगरविकास खात्याकडे मंत्र्यांनी सरकारी बंगल्याचे भाडे किती थकविले? याबाबत माहिती मागवली होती. त्यावर 26 एप्रिल रोजी ही माहिती देण्यात आली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीपर्यंत 53 हजार 276 रुपये, प्रकाश जावडेकर यांनी 86 हजार 923 रुपये थकबाकी ठेवली आहे. तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 88 हजार 269 थकबाकी रखडवलेली आहे.