राजस्थानात उष्णतेचा कहर; BSFच्या जवानांनी सीमेवर वाळूत भाजला पापड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:39 PM2022-05-03T17:39:38+5:302022-05-03T17:44:46+5:30
उन्हाचा कडाका वाढला; सीमेवर जवानांनी वाळूत पापड भाजला
बिकानेर: राजस्थानात उकाडा वाढला आहे. तापमान वाढत चालल्यानं परिस्थिती बिकट होत आहे. वाळवंटी भागात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. पश्चिम राजस्थानात तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान कडाक्याच्या उन्हात कर्तव्य बजावत आहेत. उन्हाचा कडाका इतका जास्त आहे की वाळूत पापड भाजला जात आहे. वाळूत पापड भाजणाऱ्या जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे वाळू तापली आहे. या वाळूत पापड भाजले जात आहे. यावरून उन्हाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकेल. भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांचा पापड भाजतेवेळीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही जवान पापड काही वेळ वाळूत ठेवतात. थोड्याच वेळात पापड पूर्णत: भाजला जातो. या व्हिडीओ बिकानेरमधील बज्जू भागातला आहे.
व्हिडीओमध्ये जवानांनी पूर्णपणे भाजलेला पापड आपल्या तळहातावर ठेऊन दाखवला. त्यानंतर त्यांनी पापडाचे तुकडे केले. या व्हिडीओवरून उन्हाचा कडाका किती वाढलाय ते दिसून येत आहे. या परिस्थितीतही जवान मायभूमीचं रक्षण करत आहेत. रणरणत्या उन्हातही जवान आपलं कर्तव्य बजावत आहेत.