उत्तर भारतात कडाक्याची थंडी; फुटलेल्या पाइपमधील पाणीही गोठले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 05:40 AM2024-01-20T05:40:34+5:302024-01-20T05:40:51+5:30
पंजाब आणि हरयाणामध्ये थंड हवामान कायम आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीतील अनेक भागांत दाट धुक्यामुळे आव्हानात्मक हवामान परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमडीने वायव्य राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या भागात दाट धुक्याची नोंद केली.
पंजाबमधील भटिंडा आणि राजस्थानच्या बिकानेरमध्ये सकाळच्या वेळी दृश्यमानता शून्यावर घसरली, तर दिल्ली आणि हरयाणामध्ये दृश्यमानता ५० मीटर इतकी कमी नोंदवली गेली. याचा प्रभाव पूर्व आणि ईशान्य भारतापर्यंत पसरला. बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागात मध्यम धुके जाणवले. त्रिपुरामध्ये ५० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली.
पंजाब, हरयाणामध्ये थंडी कायम
पंजाब आणि हरयाणामध्ये थंड हवामान कायम आहे. पंजाबमधील भटिंडा येथे ४ अंश तर हरयाणातील सिरसा येथे ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.अमृतसर, फरीदकोट, गुरुदासपूर, लुधियाना, पटियाला आणि पठाणकोटमध्ये अनुक्रमे किमान तापमान ६.८, ५, ५.१, ६.६, ७.६, ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हरयाणातील भिवानी आणि फतेहाबादमध्ये ४.३ अंश सेल्सिअस आणि ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. चंडीगडमध्ये ८.५ तापमानाची नोंद झाली.प्रतिकूल हवामानामुळे देशभरातील रेल्वे सेवांना विलंब झाला आहे. उत्तर रेल्वेने दिल्ली जाणाऱ्या २२ गाड्या उशीराने धावत असल्याचे सांगितले.
काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तांगमर्ग येथे पाण्याची एक पाइपलाइन फुटली. प्रचंड वेगाने पाणी बाहेर आले खरे, मात्र ते क्षणातच गाेठले.