CDS Bipin Rawat Chopper Crash: चॉपर दुर्घटनेची तीव्रता इतकी भयानक होती की...; लष्करानं दिली अंगावर काटा आणणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:43 IST2021-12-09T16:43:34+5:302021-12-09T16:43:57+5:30
CDS Bipin Rawat Chopper Crash: लष्करानं अपघाताबद्दल दिली महत्त्वाची माहिती; मृत अधिकाऱ्यांचे कुटुंबीय दिल्लीला येणार

CDS Bipin Rawat Chopper Crash: चॉपर दुर्घटनेची तीव्रता इतकी भयानक होती की...; लष्करानं दिली अंगावर काटा आणणारी माहिती
नवी दिल्ली: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या चॉपरला काल अपघात झाला. तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. त्यावेळी चॉपरमध्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि लष्करातील १२ अधिकारी होते. चॉपरमध्ये असलेल्या १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या अपघाताबद्दल भारतीय लष्करानं महत्त्वाची माहिती दिली आहे.
अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की मृतदेह ओळखण्यात अडचणी येत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना, त्यांच्या संवेदना लक्षात घेऊन आम्ही त्यांची ओळख पटवण्याचं काम करत आहोत, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. 'अपघातात मरण पावलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे कुटुंबीय दिल्लीला येत आहेत. त्यासाठी त्यांना योग्य ते सहकार्य केलं जात आहेत. त्यांना प्रवासासाठी मदत केली जात आहे,' अशी माहिती लष्करानं दिली.
मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची मदत घेतली जाईल. वैज्ञानिक सहाय्यदेखील घेण्यात येईल. ओळख पटल्यावरच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मृतांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर अपघातात जीव गमावलेल्यांचे मृतदेह आज वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयातून मद्रास रेजिमेंटल केंद्रात आणण्यात आले. जनरल रावत सुलूरहून वेलिंग्टनला जात असताना अपघात झाला. या अपघातात १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह अपघातातून बचावले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर आहे. ते ४५ टक्के भाजले असून सध्या त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.