प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 00:02 IST2024-05-18T23:41:04+5:302024-05-19T00:02:36+5:30
Sex Scandal Case : कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी संपल्यानंतर लगेचच खासदाराने देश सोडून पळ काढला.

प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
बंगळुरु : बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले फरार जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट जारी केले आहे. हसनमधील लैंगिक शोषण प्रकरणांच्या मालिकेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अर्ज केल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले होते.
कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी संपल्यानंतर लगेचच खासदाराने देश सोडून पळ काढला. तो जर्मनीत असल्याचा संशय आहे. त्याच्या ठावठिकाणाविषयी माहिती घेण्यासाठी इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. प्रज्वल रेवण्णाविरुद्ध आतापर्यंत बलात्काराचे दोन आणि लैंगिक छळाचा एक गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णाविरुद्ध आरोप असताना, त्याचे वडील आमदार एचडी रेवण्णा हे 28 एप्रिल रोजी हसनमधील होलेनरसीपूर टाउन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यांच्या घरच्या मदतनीसाने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
एचडी देवेगौडा यांनी सोडले मौन
आपला मुलगा आणि नातवावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांनी शनिवारी मौन सोडले आहे. जर नातू (प्रज्वल रेवण्णा) या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यास माझी हरकत नाही, असे एचडी देवेगौडा यांनी सांगितले. तसेच, एचडी रेवण्णाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या गोष्टींवर मी भाष्य करू इच्छित नाही. या प्रकरणात अनेक लोक सामील आहेत आणि मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, असे एचडी देवेगौडा म्हणाले.