यूपीच्या बालिकागृहातही लैंगिक शोषण, १८ मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:02 AM2018-08-07T05:02:05+5:302018-08-07T05:02:11+5:30
बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशातील देवरियाच्या बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी तेथून २४ मुलींची मुक्तता केली
देवरिया/लखनौ : बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशातील देवरियाच्या बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी तेथून २४ मुलींची मुक्तता केली असून, १८ मुली बेपत्ता आहेत. बालिकागृह चालविणारी गिरिजा त्रिपाठी, पती मोहन व अधक्षीक यांना अटक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील बालिकागृहांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. तसेच देवरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
मां विंध्यवासिनी महिला प्रशिक्षण आणि समाज सेवा संस्थान असे नाव असलेल्या बालिकागृहामध्ये ४२ मुली राहात होत्या. हे बालिकागृह सील केले असून तेथील १८ बेपत्ता मुलींचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी तेथे चौकशीसाठी पथक पाठविले आहे. देवरियाचा जिल्हा प्रोबेशन अधिकारी अभिषेक पांडे याला निलंबित केले असून इतर दोन अधिकाºयांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल.
>मुलीनेच पोलिसांसमोर मांडली कैफियत
हे बालिकागृह चालविणाºया संस्थेची मान्यता एक वर्षापूर्वीच रद्द झाली असून, सरकारी अनुदानही थांबविले होते. यातील मुलींपैकी दहा वर्षांच्या मुलीने तेथून पळ काढून लैंगिक शोषणाची कहाणी पोलिसांना सांगताच या कारवाईला वेग आला. आता येथील मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, तसेच न्यायाधीशांसमोर त्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.