चार वर्षाच्या मुलाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, दिल्लीत घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 05:17 PM2017-11-23T17:17:46+5:302017-11-23T17:19:51+5:30
द्वारका परिसरात चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली - येथील द्वारका परिसरात चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित मुलीच्या आईने मुलाला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी केली असून याप्रकरणात पोलिसांनी आता समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय.
एनडीटिव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने पोलिसांकडेही तक्रार दाखल केली असून मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. संबंधित मुलाविरोधात बलात्कार आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीचे वय सात वर्षांपेक्षा कमी असल्याने या प्रकरणात काय करायचे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बाल कल्याण समितीसमोर मुलीचा जबाब नोंदवला असून तपासात मदत करण्याच्या सूचना पोलिसांनी शाळा प्रशासनाला दिले आहेत. शाळा प्रशासन, शिक्षक यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीवर हा प्रसंग ओढावल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. वर्गात शिक्षकांची गैरहजेरी आणि स्वच्छतागृहात आयाची अनुपस्थिती यावरुन शाळेचा निष्काळजीपणा सिद्ध होतो, असे महिलेचे म्हणणे आहे.
दरम्यान, द्वारका परिसरातील शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीने शुक्रवारी तिच्या आईकडे पोटदुखीची तक्रार केली. सुरुवातीला मुलगी सहज म्हणते असावे असे आईला वाटले. पण दोन दिवसांनी मुलगी वेदनेने विव्हळत होती, रडत होती. शेवटी आईने मुलीला नेमकं काय होतंय हे विचारलं आणि मग तिने सांगितलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. पीडित मुलीवर तिच्याच वर्गातील चार वर्षांचा मुलगा लैंगिक अत्याचार करत होता. शाळेतील खोलीत आणि स्वच्छतागृहात त्याने अत्याचार केल्याचे तिने आईला सांगितले. महिलेने दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप महिलेने केला आहे.