मोठा निर्णय! लग्नाच्या खोट्या आश्वासनानंतरचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाही- न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 03:02 AM2020-06-25T03:02:03+5:302020-06-25T03:02:39+5:30
न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी गुरुवारी बलात्कार खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले व कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला.
कटक (ओदिशा) : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण ओदिशा उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती एस.के. पाणिग्रही यांनी असेही प्रश्न उपस्थित केले आहेत की, ज्या शारीरिक संबंधांमध्ये महिला स्वेच्छेने सहभागी झाली आहे, त्यांच्या नियमनासाठी बलात्कार कायद्याचा वापर केला जावा का? न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी गुरुवारी बलात्कार खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले व कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला.
नोव्हेंबर २०१९ आदिवासी महिलेने (१९) दिलेल्या तक्रारीवरून ओदिशातील कोरापूत जिल्ह्यातील विद्यार्थ्याला अटक झाली होती. तक्रारीतील तपशिलानुसार ती महिला आणि आरोपी विद्यार्थी हे एकाच खेड्यातील असून, चार वर्षांपूर्वी त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले व त्यातून ती दोन वेळा गरोदर राहिली.
‘माझ्या निष्पापपणाचा गैरफायदा घेऊन आणि मी तुझ्याशी लग्न करीन, असे खोटे आश्वासन देऊन माझ्याशी शारीरिक संबंध स्थापन केले’, अशा आरोपांची तक्रार त्या महिलेने पोलिसांकडे केली होती. आरोपीने मला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने खायला देऊन गर्भपात करायला लावले, असाही दावा तिने तक्रारीत केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून विद्यार्थ्याला अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून तो तुरुंगात होता.
उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला. त्याने सरकार पक्षाला सहकार्य करायचे आणि पीडित महिलेला धमक्या द्यायच्या नाहीत, अशा त्या अटी आहेत.
>काय म्हणाले न्यायाधीश?
12 पानी आदेशात न्या. पाणिग्रही यांनी बलात्कार कायद्याची तपशिलात चर्चा केली आणि निरीक्षण नोंदवले की, कोणत्याही आश्वासनाशिवाय पण उभयतांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असतील, तर तो भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ नुसार बलात्कार ठरत नाही. या विषयावर सखोल विचार करण्याची गरज असल्याचे सांगून न्या. पाणिग्रही म्हणाले की, असे खटले हे कायदे आणि न्यायालयीन घोषणांद्वारे कसे हाताळायचे, असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात.न्या. पाणिग्रही यांनी असेही म्हटले की, गरीब आणि सामाजिकदृष्ट्या दुबळ्या पीडितांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांना भाग पाडले जाते; परंतु त्यांचे दु:ख बलात्काराचे कायदे हलके करण्यात नेहमीच अपयशी ठरतात.