अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 10:55 AM2017-10-11T10:55:04+5:302017-10-11T13:28:19+5:30
अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
नवी दिल्ली - अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे 18 वर्षांखालील मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे हा यापुढे बलात्कार ठरणार आहे.
Sexual intercourse with wife below 18-years to be considered rape, says Supreme Court. pic.twitter.com/ElivwbTBmr
— ANI (@ANI) October 11, 2017
पति-पत्नीमधील सहमतीने शारीरिक संबंधांसाठीचे वय वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याविषयी आपले मत व्यक्त करताना केंद्र सरकारने बालविवाह हे भारतातील वास्तव असून, विवाहसंस्थेचे रक्षण झाले पाहिजे, असे उत्तर दिले होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत 15 ते 18 वर्षांपर्यंतच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे हा सुद्धा भारतीय दंडविधानानुसार दंडनीय अपराध असल्याचा निकाल दिला. तसेच देशात होत असलेल्या बालविवाहांबाबतही सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सामाजिक न्यायासाठी ज्या भावनेने कायदे बनवण्यात आले होते. त्या भावनेने त्यांची अमलबजावणी झाली नाही. अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.
कायद्यानुसार भारतात विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर मुलांसाठी वयाची 21 वर्षे पूर्ण असण्याची अट आहे. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत बालविवाहाला आणि शरीरसंबंधांना मान्यता देण्यात आली आहे. आपल्या कायद्यात बालविवाह होऊनही पती आणि पत्नी म्हणून संबंध प्रस्थापित झाल्यास त्याला कायदेशीर मान्यता दिली जाते. विशेष म्हणजे सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठीही वयाची 18 वर्ष पुर्ण असण्याचं बंधन आहे. पण जर मुलगी अल्पवयीन असेल तर तो बलात्कार समजला जातो. पण जेव्हा हीच गोष्ट लग्नाशी जोडले जाते, तेव्हा 15 वर्षाच्या पत्नीसोबत सेक्स करणं अपराध मानलं जात नाही.