मोदींच्या परराष्ट्रनितीला धक्का, चिमुकल्या सेशेल्सने अडवला भारतीय नौदलाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 07:27 PM2018-06-22T19:27:12+5:302018-06-22T19:27:12+5:30
भारताच्या नौदलाला आपल्या देशात तळ उभा करु देणे म्हणजे आपल्या सार्वभौमत्त्वावर संकट आल्यासारखे आहे.
अॅन्से आऊक्स पिन्स- सेशेल्स या हिंदी महासागरातील चिमुकल्या देशाने भारत सरकारच्या एका मोठ्या निर्णयाचा मार्ग अडवून धरला आहे. भारत सरकारने सेशेल्समध्ये नौदलाचा तळ उभा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सेशेल्सच्या संसदेत त्याला मंजूरी मिळणे अत्यंत कठिण झाले आहे.
भारताच्या नौदलाला आपल्या देशात तळ उभा करु देणे म्हणजे आपल्या सार्वभौमत्त्वावर संकट आल्यासारखे आहे अशाप्रकारचे मत तेथिल विरोधी पक्षांनी संसदेत व्यक्त केले आहे. भारत आणि सेशेल्स यांच्यामध्ये नौदल तळासंदर्भात करार झाला आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्याला आधीपासूनच विरोध केला असल्यामुळे सेशेल्स सरकारने तो करार संसदेसमोर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचे हिंदी महासागरात नौदलाचा तळ उभारण्याचे स्वप्न पूर्ण होणे सध्या शक्य दिसत नाही. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फाऊरे भारताच्या भेटीवर येत असून रविवारी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नौदलाच्या तळाचा मुद्दा विचारात घेतला जाणार नाही असे फाऊरे यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे.