“अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील; सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:49 PM2020-08-06T18:49:04+5:302020-08-06T18:50:43+5:30
अल्लाहच्या भरवशावर आम्हाला आजही अपेक्षा आहे. या जागेवर मस्जिद होती, आहे आणि यापुढे राहील, ती कोणीच मिटवू शकत नाही असंही खासदार बर्क यांनी सांगितले.
संभळ – गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेला राम मंदिर जन्मभूमीचा वाद सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मार्गी निघाला. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळा पार पडला, यानिमित्ताने अनेकांनी जुन्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. राम मंदिर निर्माण भूमीपूजन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं.
त्यानंतर आता या मुद्द्यावरुन काही नेते वादग्रस्त विधान करत आहेत. उत्तरप्रदेशातील संभळ मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर्रहममान बर्क यांनी अयोध्येत बाबरी मस्जिद होती, आहे आणि कायम राहील. नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या ताकदीच्या जोरावर कोर्टात आपल्या बाजूने निर्णय वळवला. परंतु मुस्लीम मोदी-योगी नव्हे तर अल्लाहच्या भरवशावर आहेत. त्यामुळे मुस्लिमांना दहशतीखाली राहण्याची गरज नाही असं विधान त्यांनी केले आहे.
तसेच संग ए बुनियाद रखना, जम्हूरियत का कत्ल करना है अशा शायराना अंदाजात त्यांनी सांगितले की, आम्ही जे काही सांगत आहोत त्याला ठोस आधार आहे. सध्या त्यांचे सरकार आहे, ताकदीच्या बळावर त्यांनी हे सर्व केले आहे. कोर्टानेही त्यांचा निर्णय दिला आहे. हा कायदेशीर न्याय नाही तर आमच्यासोबत खूप अन्याय झाला आहे. पण आम्ही वाट पाहण्याचं काम करत आहोत, अल्लाहच्या भरवशावर आम्हाला आजही अपेक्षा आहे. या जागेवर मस्जिद होती, आहे आणि यापुढे राहील, ती कोणीच मिटवू शकत नाही असंही खासदार बर्क यांनी सांगितले.
दरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल.
तर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनावर टीका केली होती. भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसी म्हणाले होते.