गांधींवरील वक्तव्याबद्दल शाह व मोदी यांनी माफी मागावी; काँग्रेसची मागणी
By Admin | Published: June 11, 2017 12:54 AM2017-06-11T00:54:56+5:302017-06-11T00:54:56+5:30
महात्मा गांधी हा चतुर बनिया होता, या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने शनिवारी आक्षेप घेतला. हे वक्तव्य राष्ट्रपित्याचा अपमान करणारे असून
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महात्मा गांधी हा चतुर बनिया होता, या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने शनिवारी आक्षेप घेतला. हे वक्तव्य राष्ट्रपित्याचा अपमान करणारे असून, त्याबद्दल शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अमित शाह यांनी गांधीजींचा उल्लेख एकेरी केला होता, त्याचाही काँग्रेसने निषेध केला आहे.
‘जातीयवादाविरुद्ध लढण्याऐवजी ते (भाजपा) राष्ट्रपित्याचीही जात काढतात. यावरून सत्ताधारी पक्ष आणि त्याच्या प्रमुखांचे चरित्र तसेच विचारसरणी लक्षात येते. हे लोक देशाला नेमके कोठे नेणार आहेत,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला.
राष्ट्रपिता व स्वातंत्र्य चळवळीचा अपमान केल्याबद्दल शाह, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबे आणि प्रत्येक नागरिकाची माफी मागायला हवी, असे ते म्हणाले.
भाजपाप्रमुख शाह यांनी रायपूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना शुक्रवारी महात्मा गांधी यांचा ‘बहुत चतुर बनिया’ असा उल्लेख केला. काँग्रेसची कोणतीही विचारसरणी आणि तत्त्वे नाहीत. केवळ स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचे ते ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ होते. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसचे औचित्य संपले आहे,’ असेही शाह म्हणाले.
‘स्वत: सत्तेचे व्यापारी असलेले अमित शाह आज स्वातंत्र्य चळवळीला बिझनेस मॉडेल म्हणत आहेत; परंतु वस्तुस्थिती ही आहे की, स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी देशाची फाळणी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचा स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून वापर केला होता’. आजही भाजपा मोजक्या उद्योग घराण्यांचे व्यावसायिक हित सांभाळण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणूनच काम करीत आहे, असा घणाघात सूरजेवाला यांनी केला.
सूरजेवाला यांच्या मते शाह यांचे वक्तव्य स्वातंत्र्यसैनिक, त्यांचा त्याग तसेच राष्ट्रपित्याचा अपमान करणारा आहे.