शाहजहान सासुरवाडीला गेला अन् ३७ वर्षे तुरुंगात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:11 AM2024-08-22T07:11:54+5:302024-08-22T07:12:09+5:30
अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली.
अगरतळा : नातेवाइकांना भेटण्यासाठी बांगलादेशात गेलेल्या त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील एक व्यक्ती तब्बल ३७ वर्षांनी मायदेशी परतली. शाहजहान (६२) असे भारतीय व्यक्तीचे नाव असून, तो १९८८ साली बांगलादेशात गेला होता. मात्र, अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली. मंगळवारी अखेर तो स्वत:च्या घरी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शाहजहान सीमेलगतच्या रबींद्रनगर गावातील रहिवासी आहे. लग्नानंतर तो बांगलादेशातील कोमिला गावात सासरवाडीच्या लोकांना भेटण्यासाठी गेला होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांच्या घरावर छापा टाकत अवैधरीत्या प्रवेश केल्याच्या आरोपाखाली शाहजहानला अटक केली. बांगलादेश सरकारकडून मायदेशी जाण्याची परवानी मिळेपर्यंत मी तब्बल ३७ वर्षे तुरुंगात काढल्याचा दावा शहाजहान केला आहे.