बँकांच्या रांगेत 36 नागरिक शहीद - गुलाम नबी आझाद
By admin | Published: November 17, 2016 06:15 PM2016-11-17T18:15:34+5:302016-11-17T18:23:16+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची तुलना उरी हल्ल्यातील शहिदांशी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची तुलना उरी हल्ल्यातील शहिदांशी केली आहे. राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या अनुपस्थितीत जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळे आज राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत हजर झाल्यावर आम्ही गोंधळ न घालता कामकाज सुरळीत पार पाडू, असंही आझाद म्हणाले आहेत. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांना लक्ष्य करत भाजपावर घणाघाती टीका केली आहे.
काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, नोटाबंदीसारख्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लोकांचा जीव जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत उरी हल्ल्यातील शहिदांपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उरी हल्ल्यात भारतीय जवानांना मारलं नसेल. किंबहुना त्यापेक्षाही जास्त लोक केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शहीद झाले आहेत. आझाद यांच्या वक्तव्यावर व्यंकय्या नायडूंनी आक्षेप घेतला आहे. आझाद यांनी शहिदांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असा पलटवार करत नायडूंनी आझाद यांच्यावर टीका केली आहे.