'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:25 IST2023-02-09T13:24:05+5:302023-02-09T13:25:22+5:30
पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली.

'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश
यशराज फिल्म्सच्या 'पठाण' मधून शाहरुखने (Shahrukh Khan) बॉलिवूडचा किंग आपणच हे दाखवून दिले आहे. पठाणची बॉक्सऑफिसवरील एकंदर कमाई बघता याचा अंदाज येईल. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.तीव्र विरोध पत्करुन पठाण रिलीज झाला आणि या बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. याउलट एकंदर कॉन्ट्रोव्हर्सीचा पठाणला फायदाच झाला. पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. आता तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'पठाण'चे कौतुक केले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आदरणीय अध्यक्षजी, वर्तमानपत्रात बातमी आली होती जेव्हा लोक टीव्हीवर चमकण्यासाठी धडपडत होते तेव्हा कित्येक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर हाऊसफुल सुरु आहेत.'
After decades, the Theatres of Srinagar are going Housefull: PM #NarendraModi#ShahRukhKhan with #Pathaan has done unimaginable things. pic.twitter.com/7IlYCsMuJ4
— JUST A FAN. (@iamsrkfan_brk) February 8, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी पठाणशी संबंध जोडला आहे. शाहरुखचे चाहते तर भलतेच खूश झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की,'आता तर जगाने मान्य केले आहे. खरंच हा क्षण भारतासाठी अभिमानाचा आहे. शाहरुख खान आणि पठाणला प्रत्येकाकडून खूप प्रेम मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मान्य केले आहे.' तर आणखी एक चाहता म्हणतो, 'पंतप्रधान मोदींनाही माहित आहे की पठाण काय धुमाकूळ घालत आहे.'
'पठाण'च्या रिलीज आधीच सिनेमातील बेशरम रंग गाण्याने वादाला तोंड फुटले होते. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणत तीव्र विरोध झाला. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्सऑफिस वरील कमाई आणि चाहत्यांचा उत्साह पाहता पठाणने तुफान कामगिरी केल्याचं दिसतंय.
'पठाण'ने रिलीजच्या 14 व्या दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यामुळे 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पठाण'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दक्षिण सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF 2 ला मागे टाकले आहे. 'पठाण'चे भारतातील सर्व भाषांमधील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 446.02 कोटी आहे. तर वर्ल्डवाईड पठाण १००० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे.