शाहरूख खानच्या ‘फॅन’चा गर्दीत मृत्यू
By admin | Published: January 25, 2017 12:57 AM2017-01-25T00:57:57+5:302017-01-25T00:57:57+5:30
: अभिनेता शाहरूख खान याला बघण्यासाठी सोमवारी उसळलेल्या गर्दीत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश
वडोदरा/नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खान याला बघण्यासाठी सोमवारी उसळलेल्या गर्दीत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.
‘रईस’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या शाहरूख खान हा त्याच्या जाहिरातीसाठी वडोदरा रेल्वेस्टेशनवर रेल्वेने सोमवारी रात्री आला होता. त्याला बघण्यासाठी चाहत्यांची स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली होती. तीत फरीद खान पठाण (४५) या स्थानिक राजकीय नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रभू यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस महासंचालकांना घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती मंगळवारी टिष्ट्वटरद्वारे दिली.
फरीद खान पठाण यांचा मृत्यू हा दुर्दैवी असल्याचे शाहरूख खान याने म्हटले. मुंबई-दिल्ली आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने वडोदरा रेल्वेस्थानकावर शाहरूख खान सोमवारी रात्री १०.३० वाजता दाखल झाला. त्याला पाहण्यासाठी सुमारे १५ हजार चाहत्यांची गर्दी उसळली होती व ती बेभान बनली. त्या गोंधळात खान यांचा मृत्यू झाला. गुजरात रेल्वे पोलीसही या घटनेची चौकशी करीत आहेत. शाहरूख खान याच्यासोबत प्रवास करीत असलेल्या पत्रकाराचे फरीद पठाण हे नातेवाईक होते व त्याला भेटण्यासाठी ते आले होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे दोन पोलीसही जखमी झाले.
रेल्वे स्थानकात थांबताच काही चाहत्यांनी खिडक्यांच्या तावदानांवर जोरजोराने तडाखे द्यायला सुरुवात केली. त्या वेळी पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. फरीद पठाण यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धावत्या रेल्वेमागे जमाव पळत असताना पोलिसांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा फरीद खान पठाण बेशुद्ध पडले व नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेचे पोलीस अधीक्षक (वडोदरा विभाग) शरद सिंघल म्हणाले की, आयोजकांनी अशा कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली होती का याची चौकशी केली जाईल.