शहा यांचा एक लाख कि.मी.चा दौरा

By admin | Published: May 4, 2017 01:19 AM2017-05-04T01:19:23+5:302017-05-04T01:19:23+5:30

आगामी लोकसभा निवडणूक अजून दोन वर्षे दूर असली तरी तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत आणि अधिक देशव्यापी

Shah visited one lakh kms | शहा यांचा एक लाख कि.मी.चा दौरा

शहा यांचा एक लाख कि.मी.चा दौरा

Next

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक अजून दोन वर्षे दूर असली तरी तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत आणि अधिक देशव्यापी करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा आत्तापासूनच कामाला लागले असून, यासाठी ते पुढील सलग पाच महिने देशव्यापी दौरा करणार आहेत.
अमित शहा हे केवळ मुरब्बी राजकीय डावपेचकार नाहीत, तर कठोर ‘टास्क मास्टर’ही आहेत. इतरांना कामाला लावण्यासाठी स्वत: अपार कष्ट घेणे ही त्या कार्यपद्धतीची खासियत आहे. यानुसारच त्यांनी हा दौरा हाती घेतला आहे.
देशाच्या ज्या भागांत भाजप अजूनही प्रबळ नाही तेथे तो रुजवून वाढवायचा व जेथे प्रबळ आहे तेथे मरगळ झटकून पक्षसंघटना अभेद्य करायची, हा या दौऱ्याचा हेतू आहे.
पक्षाच्या सूत्रांनुसार खरे तर शहा यांचा हा दौरा एप्रिलमध्ये त्यांनी जम्मू-काश्मीर व प. बंगालला दिलेल्या भेटीने याआधीच सुरू झाला आहे. दौऱ्यासाठी ठरलेल्या प्राथमिक कार्यक्रमानुसार आज ३ मे रोजी हिमाचल प्रदेशपासून या दौऱ्याचा पुढील टप्पा सुरू होईल व सुमारे पाच महिन्यांनी २५ सप्टेंबर रोजी तेलंगणमध्ये त्याची सांगता होईल.
या दौऱ्यात भाजपाध्यक्ष देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांनाच नव्हे, तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप या बेटांनाही भेट देतील. या दौऱ्याच्या कार्यक्रमावर नजर टाकली, तर अमित शहा या पाच महिन्यांत सुमारे एक लाख कि.मी. प्रवास करतील व पाचपैकी तीन महिने ते प्रवासात असतील, असे दिसते. पक्ष सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी १९ एप्रिल रोजी झालेल्या भाजपच्या ‘कोअर ग्रुप’च्या बैठकीत या दौऱ्याची आखणी केली गेली.
देशातील राज्यांची ‘ए’ ‘बी’ आणि ‘सी’, अशा तीन गटांत वर्गवारी करून या दौऱ्याची ढोबळमानाने आखणी केली गेली. संबंधित राज्याचा आकार, लोकसंख्या व तेथील लोकसभेच्या जागा यानुसार ही वर्गवारी आहे. ‘ए’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी तीन दिवस, ‘बी’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी दोन दिवस व ‘सी’ वर्गातील राज्यांमध्ये प्रत्येकी एक दिवस शहा दौरा करतील. बहुतांश केंद्रशासित प्रदेशांत त्यांचा एक दिवसांचा दौरा असेल. सध्या ठरलेल्या ठोबळ कार्यक्रमानुसार या दौऱ्यात अमित शहा १६, १७ व १८ जून, असे तीन दिवस महाराष्ट्रात असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

दौरा नेमका कशासाठी?

प्रचंड बहुमताने सत्तेवर असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने निवडणूक तोंडावर नसताना अशा प्रकारे दौरा काढून संपूर्ण देश पिंजून काढणे या दृष्टीने शहा यांचा हा दौरा नक्कीच ‘न भूतो...’ असा आहे; पण याचा नेमका हेतू काय? मोदींच्या जादूचे गारूड मतदारांच्या मनातून उतरून त्यांचा भ्रमनिरास होत असल्याची चाहूल लागल्याने किंवा तसे होऊ नये यासाठी तर हा दौरा नसावा ना, अशी शक्यताही राजकीय निरीक्षकांना वाटते.

Web Title: Shah visited one lakh kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.