शहा VS आनंदीबेन; संघर्ष तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:30 AM2017-12-05T04:30:26+5:302017-12-05T04:30:46+5:30
मुख्यमंत्रिपदावरून आनंदीबेन पटेल यांची गच्छंती केल्यापासून भाजपा अध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागल्याचे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार सांगत आहेत...
संदीप प्रधान
बडोदा : मुख्यमंत्रिपदावरून आनंदीबेन पटेल यांची गच्छंती केल्यापासून भाजपा अध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागल्याचे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार सांगत आहेत. अहमदाबाद महापालिका निवडणुकीत आनंदीबेन यांनी शहा समर्थकांची तिकिटे कापली व त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत शहा यांनी काढल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही मतदारसंघांतील बंडखोरी त्याच संघर्षाचा परिपाक असून, ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जाताना आपल्या विश्वासातील आनंदीबेनना मुख्यमंत्री केले. मात्र त्यांच्या कार्यशैलीबाबत टीका होऊ लागताच मोदी यांच्या इच्छेविरुद्ध आनंदीबेनना पदावरून दूर करून शहा यांनी आपले विश्वासू विजय रूपाणी यांना मुख्यमंत्री केले. आनंदीबेनना त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. मात्र पटेल यांना खुर्चीवर बसवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आनंदीबेन यांच्याकडेच सूत्रे सोपवण्यासारखे होईल, अशी भूमिका शहा यांनी घेतली आणि ती मोदी यांनाही स्वीकारण्यास भाग पाडले. तेव्हापासून शहा-पटेल वाद चिघळला. बडोद्यातील अकोटा मतदारसंघात या संघर्षाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. येथून आमदार झालेले व आनंदीबेन मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री असणारे सौरभ पटेल यांच्या उमेदवारीवरून बरेच राजकारण रंगले. सौरभ रिलायन्स उद्योगसमूहाच्या जवळचे मानले जातात.
रूपाणी मुख्यमंत्री झाल्यावर सौरभना दूर केले. सौरभ पटेल पूर्वी सौराष्ट्रातील बोटादमधून लढले होते. तेथे विरोध झाल्याने मागील वेळी अकोटामधून त्यांना उमेदवारी दिली गेली. या वेळी अकोटामधून महापौर भरत डांगर व सरचिटणीस शब्दशरण ब्रह्मभट यांनी सौरभ पटेल यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा सौराष्ट्रात धाडले आणि सीमा मोहिले यांना भाजपाने उमेदवारी दिली.
शहरवाडी मतदारसंघातून भाजपाने मनीषा वकील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तेथे माजी महापौर सुनील सोलंकी, प्रदेश सरचिटणीस जीवराज चव्हाण व ललित राज या तिघांनी वकील यांना पराभूत करण्यासाठी आघाडी उघडली आहे. हे तिघेही आनंदीबेन यांचे निकटवर्तीय आहेत. बडोद्याच्या ग्रामीण भागातील वाघोडियामधून भाजपाने मधू श्रीवास्तव यांना पुन्हा उमेदवारी दिली. श्रीवास्तव वादग्रस्त आहेत. मात्र लोकांची ते तत्परतेने कामे करतात. श्रीवास्तव यांनी स्वत:च गुजराती चित्रपटांची निर्मिती केली असून, त्यामध्ये दरोडेखोराची भूमिका केली आहे. येथून धर्मेंद्रसिंग वाघेला यांनी बंडखोरी केली आहे. अमित शहा यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पक्षाने त्यांना निलंबित केलेले नाही.
अनेकांना वाटते ही अखेरची संधी
गुजरातमध्ये २२ वर्षे भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा धोका आहे. मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भक्कम सत्ता असणे हा गुजरातमधील भाजपासाठी मोठा आधार आहे. यानंतर अँटी इन्कम्बन्सी अधिक तीव्र होईल व केंद्रात भाजपाची सत्ता असेलच, याची खात्री नाही. त्यामुळे गुजरात भाजपातील अनेकांना यंदा विजयी होण्याची ही अखेरची संधी वाटते. त्यामुळेही बंडखोरी वाढल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री पदावरून पेटला होता वाद
मुख्यमंत्रिपदावरून आनंदीबेनना हटवले नसते तर ही विधानसभा निवडणूक भाजपाला आणखी कठीण गेली असती. मोदींच्या इच्छेविरुद्ध आनंदीबेनला हटवून रूपाणी यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शहा व आनंदीबेन यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. काही ठिकाणची बंडखोरी हा त्याच संघर्षाचा परिपाक आहे.
- अनिल देवपूरकर, ज्येष्ठ पत्रकार