शहाबुद्दीनची तिहार जेलमध्ये रवानगी करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
By Admin | Published: February 15, 2017 01:12 PM2017-02-15T13:12:04+5:302017-02-15T13:12:04+5:30
शहाबुद्दीनला कोणतीही विशेष वागणूक मिळू नये, तसंच योग्य आणि निष्पक्ष कारवाई व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला हा आदेश दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन याची बिहारमधील सिवान कारागृहातून तिहार कारागृहात रवानगी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अनेक प्रकरणी खटला चालू असलेल्या मोहम्मद शहाबुद्दीनला कोणतीही विशेष वागणूक मिळू नये, तसंच योग्य आणि निष्पक्ष कारवाई व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला हा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शहाबुद्दीनची तिहार कारागृहात रवानगी करण्यासाठी राज्य सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. तसंच शहाबुद्दीनविरोधात असलेल्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावी असाही आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. बिहारमधून बाहेर नेणे माझ्या मुलभूत हक्काचं उल्लंघन असल्याचा शहाबुद्दीनचा दावा न्यायालयाने फेटाळला. समाजाचं हित जास्त महत्वाचं असल्याचं न्यायालयाने सांगितलं.
चंद्रकेश्वर प्रसाद उर्फ चंदा बाबू यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. शहाबुद्दीन आणि त्याच्या सहका-यांनी चंदा बाबू यांच्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. चंदा बाबू यांच्या दोन मुलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने 2015 मध्ये शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तिस-या मुलाच्या हत्येचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. शहाबुद्दीन साक्षीदारांवर दबाव आणत असून खटल्याला वेगळं वळण देत आहे असा आरोप चंदा बाबू यांनी केला आहे.