8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:14 AM2020-02-06T11:14:05+5:302020-02-06T11:14:18+5:30
नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत मोठी घटना घडणार अशी शंका एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केली आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर दिल्लीतील शाहीन बागचे रुपांतर जलियनवाला बागमध्ये होईल, असंही ते म्हणाले.
दिल्लीतील शाहीन बागमध्ये मागील 50 दिवसांपासून नागरिकता संशोधन कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात संसदेतून बाहेर आल्यानंतर ओवेसी यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्यानंतर भाजपकडून या आंदोलनात गोळीबार करण्यात येईल. हे लोक शाहीन बागचे रुपांतर जलियनवाला बागमध्ये करणार आहेत. भाजपच्या एका मंत्र्यांनेच या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे सरकारला यावर उत्तर द्यावे लागले, असंही ओवेसी यांनी सांगितले.
ओवेसी यांचा इशारा भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे होता. दिल्लीतील प्रचार सभेत बोलताना ठाकूर यांनी उपस्थितांकडून नारेबाजी करून घेतली होती. त्यानंतर दिल्लीतील शाहीन बाग राजकीय केंद्रबिंदू बनले होते.
नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.