Shaheen Bagh Protest: आंदोलनस्थळी पेट्रोल बॉम्ब फेकला, निदर्शकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:10 PM2020-03-22T12:10:13+5:302020-03-22T12:10:21+5:30
जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी फक्त 4-5 महिला शाहीन बागमध्ये निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या.
नवी दिल्लीः जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शाहीन बाग भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलक विरोध प्रदर्शन करत आहेत. विरोध प्रदर्शन करत असलेल्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी घटनास्थळाजवळ पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बॅरिकेड्सजवळील सापडलेल्या प्लास्टिकच्या बाटलमधून काही स्फोटक सामान जप्त करण्यात आलं आहे. विशेष पोलीस आयुक्तांनी ही कोणतीही मोठी घटना नसल्याचं म्हटलं आहे. जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी फक्त 4-5 महिला शाहीन बागमध्ये निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या.
जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी असा दावा केला आहे की, गेट क्रमांक 7वर असलेल्या निदर्शन स्थळावर काही लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आहे. घटनास्थळी काचेचे तुकडेही सापडले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकू आला असून, धूरही दिसला. दुचाकीवरून दोन जण आले होते. मात्र जामिया निषेधस्थळी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Delhi: Protesters at Shaheen Bagh allege that a petrol bomb was hurled nearby the anti-Citizenship Amendment Act protest site today pic.twitter.com/tHVzQfmKii
— ANI (@ANI) March 22, 2020
विरोधकांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय 23 मार्चला सुनावणी करणार
कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय ऐकण्यास सहमती दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालय 23 मार्च रोजी यावर सुनावणी करणार आहे.