शाहीनबागला पोलिसांनी घातला वेढा, दिल्लीतील हिंसाचारानंतर सतर्कता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:50 AM2020-03-02T06:50:31+5:302020-03-02T06:51:42+5:30
शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वेढा दिला आहे.
नवी दिल्ली : शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वेढा दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात महिला येथे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. शाहीनबागचा रस्ता एक मार्च रोजी रिकामा करण्यात येईल, असा इशारा हिंदू सेनेने दिला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी शाहीनबागच्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत सीएएवरुन मोठा हिंसाचार झाला असल्याने पुन्हा अनुचित प्रकार घडू नये याच्या खबरदारीसाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. अगदी योग्य वेळेवर आम्ही आंदोलकांशी चर्चा केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. फक्त खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या तुकड्या तेथे सज्ज ठेवण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त आर पी मीणा यांनी सांगितले आहे.
दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण १२ तुकड्या सध्या शाहीन बाग परिसरात पहारा देत आहेत. हिंदू सेनेने निषेध सभा रद्द केली असली तरी शाहीनबाग भागात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी जमावबंदी लागू केली. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.