शाहीनबाग : व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करा : प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:39 AM2020-02-17T06:39:36+5:302020-02-17T06:40:08+5:30
निदर्शकांनी आधी रविवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती.
1 जामिया मिलिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून १५ डिसेंबर रोजी पोलीस व निमलष्करी जवान विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करीत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर शेअर केला व यानंतरही पोलिसांवर कारवाई झाली नाही, तर सरकारचा असली इरादा जगापुढे येईल, असे म्हटले.
2 पोलिसांनी ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली नाही, असे दिल्ली पोलीस व गृहमंत्री अमित शहा यांनी खोटे सांगितले, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होते, असेही त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले. विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश असलेल्या जामिया समन्वय समितीने रविवारी ४८ सेकंदांचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
3 हा व्हिडिओ आमच्याही पाहण्यात आला आहे व जामियातील घटनांच्या सुरू असलेल्या तपासात त्या अनुषंगानेही चौकशी केली जाईल, असे गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी सांगितले.
शाहीनबाग : गृहमंत्र्यांशी चर्चेसाठी परवानगीची प्रतीक्षा
नवी दिल्ली : प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर नवीन नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानाकडे कूच करणार. पोलिसांकडून परवानगी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. पोलिसांनी वेळ मागितला आहे, असे शाहीन बाग निदर्शकांनी म्हटले आहे.
निदर्शकांनी आधी रविवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मोर्चाने जाण्यासाठी शाहीन बाग परिसरात शेकडो महिला जमल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी कठडे लावण्यात आले आहेत. निदर्शकांना तेथून दूर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यासाठी शाहीन बागची दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांसह निदर्शकांनी आठ सदस्यांचे एक शिष्टमंडळ निवडले आहे. विनंतीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी यासाठी काही वेळ मागितला आहे. पोलिसांची मंजुरी मिळाल्यानंतर निदर्शक आपला कार्यक्रम आखतील, असे निदर्शक जावेद खान यांनी सांगितले. आवश्यक मंजुरी न मिळाल्याने सीएएविरोधी निदर्शक निदर्शनाच्या ठिकाणी परतले आहेत. दरम्यान, आग्नेय दिल्लीचे पोलीस आयुक्त आर.पी. मीणा आणि अतिरिक्त आयुक्त कुमार ज्ञानेश व शाहीन बाग पोलीस ठाणे अधिकाºयाने निदर्शकांच्या एका गटाशी चर्चा केली. पुढील कार्यवाही निवदेन संबंधित अधिकाऱ्यांनाकडे पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, नवीन नागरिकत्व कायद्याशी संबंधित मुद्यावर चर्चा करण्यासाठी कोणतीही इच्छुक व्यक्ती माझ्या कार्यालयाकडून वेळ घेऊ शकते.