शाही इमाम बुखारींचे शरीफ यांना निमंत्रण तर मोदींना 'नो एंट्री'
By admin | Published: October 30, 2014 03:28 PM2014-10-30T15:28:24+5:302014-10-30T15:30:26+5:30
जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मुलाच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रीत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे बुखारींनी याच कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. हर्षवर्धन, भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन आणि राज्यसभा खासदार विजय गोयल यांना निमंत्रीत केले आहे.
शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी त्यांचे १९ वर्षाचे पुत्र शाबान बुखारी यांना वारसदार म्हणून जाहीर केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी शाबान बुखारी यांची नायब शाही इमामपदी नेमणूक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बुखारी यांच्या निमंत्रितांच्या यादीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा समावेश आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. याविषयी बुखारी म्हणाले, मोदी मुसलमानांचे प्रतिक वापरत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच मुसलमान त्यांच्याशी जुळू शकले नाही. मुसलमानांचा विश्वास संपादन करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नवाझ शरीफ हे व्यस्त असल्याने त्यांच्याऐवजी भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासीत या कार्यक्रमाला येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
जामा मशिदीतील इमाम हे पद गेल्या ४०० वर्षांपासून बुखारी घराण्याकडे आहे. त्यामुळे शाबान बुखारी यांच्या नायब इमाम पदावरील नियुक्ती ही महत्त्वाची मानली जाते. या कार्यक्रमासाठी २२ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर रोजी विशेष पाहुणे आणि दिल्लीकरांसाठी डिनर असेल. तसेच २९ नोव्हेंबर रोजी विविध देशांचे राजनैतिक अधिकारी आणि दिग्गज व्यक्तींसाठी विशेष कार्यक्रम असेल. या कार्यक्रमासाठी जगभऱातून सुमारे एक हजार धार्मिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, अभिषेक मनु सिंघवी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचादेखील पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे.