शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 06:21 PM2018-04-03T18:21:55+5:302018-04-03T18:21:55+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला आहे. त्याने भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला आहे. त्याने लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट केले असून त्याने काश्मीरमधील स्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनांच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्व:ताच्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत? असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले आहे.
Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018
शाहिद आफ्रिदीने हा पहिल्यांदाच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला नाही. याआधी म्हणजेच गेल्यावर्षी त्याने याबाबतीत ट्विट केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते, काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून क्रूरतेचे शिकार होत आहेत. आता वेळ आली आहे की या समस्येचे निराकरण केले पाहिजे, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले. तसचे, दुस-या ट्विटमध्ये काश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे आणि आम्ही निरपराधांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 अतिरेक्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.
अधिका-यांनी सांगितले की, शोपियांच्या काचदुरू भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या ठिकाणाहून अतिरेक्यांचे तीन मृतदेह मिळाले आहेत. काचदुरू येथील मोहीम संपलेली आहे. सुरक्षा दल उद्या पुन्हा येथे तपास मोहीम राबविणार आहे. पोलीस महासंचालकांनी एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नांचाही या वेळी उल्लेख केला. दायलगाम चकमकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी एका अतिरेक्याच्या नातेवाइकांना फोन केला. ते त्यांच्याशी ३० मिनिटे बोलले. जेणेकरून, या अतिरेक्याला आत्मसमर्पण करण्यासाठी तयार केले जावे. मात्र, या अतिरेक्याने आपल्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकले नाही. या अतिरेक्याने पोलिसांच्या दिशेने फायरिंग केली. त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकी मारला गेला, तर अन्य एक जण जिवंत पकडला गेला.