शहिदाच्या मुलीला नेले पोलिसांनी फरपटत, जाहीर झालेली मदत मागितल्याने अपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 04:45 AM2017-12-03T04:45:00+5:302017-12-03T04:45:00+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, काँग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणा-या शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी सभेतून धक्के मारून बाहेर काढले होते.
अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रचारसभेत शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, काँग्रेस व राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणा-या शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी सभेतून धक्के मारून बाहेर काढले होते.
गेल्या १५ वर्षांत या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आश्वासन देऊ नही मदत दिली नाही. सभेच्या वेळी मुलीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. आता तरी त्या मुलीला, कुटुंबीयांना न्याय द्या, असे राहुल यांनी म्हटले आहे.
रूपानी प्रचारसभेत भाषण करत असताना, रूपल तडवी ही मुलगी व्यासपीठाच्या दिशेने धावत गेली आणि मला त्यांना भेटायचे आहे, असे सांगू लागली. बीएसएफचे शहीद जवान अशोक तडवी यांची ती मुलगी आहे. तडवी शहीद झाल्यानंतर, गुजरात सरकारने कुटुंबीयांना जमीन देण्याचे आश्वासन दिले, पण त्यांना ती मिळाली नाही. ती व्यासपीठाकडे जात असताना महिला पोलिसांनी तिला फरपटत दूर नेले. मी तुम्हाला कार्यक्रमानंतर भेटतो, असे मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले, पण तिला न भेटताच ते गेले. (वृत्तसंस्था)
आचारसंहितेत मदत मिळेल?
राहुल गांधी यांनी ही बाब उघड करताच, तडवी यांच्या पत्नी रेखाबेन यांना सरकारकडून चार एकर जमीन, दरमहा १० हजार रुपये पेन्शन आणि ३६ हजार रुपये वार्षिक पेन्शन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी जाहीर केले, तसेच रस्त्याला लागून घरासाठी भूखंड दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पण निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अशी घोषणा करता येते का आणि
आता लगेच ती मदत
दिली जाईल का, ही
शंकाच आहे.