शहिदाच्या कुटुंबास मागितला अंत्यविधीचा खर्च
By admin | Published: April 16, 2015 01:38 AM2015-04-16T01:38:05+5:302015-04-16T01:38:05+5:30
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाकडे पोलीस खात्याने अंत्यसंस्काराचा खर्च मागितल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे.
रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाकडे पोलीस खात्याने अंत्यसंस्काराचा खर्च मागितल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. शहिदाच्या अंत्यसंस्कारासाठी दिलेले १० हजार रुपये तात्काळ परत करा, अशी मागणी करणारे पत्र कुटुंबाला गरियाबंद पोलिसांनी पाठवले आहे.
या प्रकारानंतर टीकेची झोड उठताच बुधवारी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी संबंधित पत्र पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांकडून खुलासाही मागवला.
२३ मे २०११ रोजी चकमकीत ‘स्पेशल आॅफिसर’ किशोर पांडे शहीद झाले होते. पांडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी तात्कालिक रूपात अशासकीय कल्याण निधीतून १० हजार त्यांच्या कुटुंबाला दिले होते.
आधी अपमान, मग सारवासारव
या संतापजनक प्रकारावर टीकेची झोड उठताच, पोलीस खात्याने सारवासारव करत, संबंधित पत्र रद्द केले. राज्यात नक्षल प्रकरणांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. विज यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत तातडीने ही कारवाई केली.
काँग्रेसची टीका
शहिदांचा अपमान करण्याची या सरकारला सवय आहे. ज्या कुटुंबाने आपला सुपुत्र गमावला, त्यांच्याकडे अंत्यसंस्काराच्या पैशाची मागणी करणे अपमानास्पद आहे. हा केवळ त्यांचा नव्हे, तर सर्व शहिदांचा अपमान आहे, असे काँग्रेस प्रवक्ते शैलेश नितीन त्रिवेदी म्हणाले. (वृत्तसंस्था)