शाहरुखने नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली? स्वामींच्या दाव्यावर मॅनेजर पूजा दादलानीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:15 PM2024-02-13T18:15:15+5:302024-02-13T18:15:35+5:30
कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरुप सुटका झाली आहे. यापैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत.
कतारच्या तुरुंगात असलेल्या ८ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना सोडविण्यात बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानची मदत घेतल्याचा दावा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यावर शाहरुख खान कडून खुलासा आला आहे.
कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरुप सुटका झाली आहे. यापैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. भारतात परतल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या माजी अधिकाऱ्यांनी सुटकेचं श्रेय दिले आहे. असे असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एका बॉलिवुड अभिनेत्याच्या मध्यस्थीमुळे या नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्याचा दावा केला आहे.
परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए अयशस्वी ठरल्यानंतर बॉलिवुडचा बादशाहा शाहरुख खानला मोदींनी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यानंतर आपल्या माजी अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी खूपच महागडी डील करण्यात आल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.
यावर शाहरुख खानच्या टीमचे निवेदन आले आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिने तिच्या इन्स्टावर ही पोस्ट केली आहे.
कतारमधून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा यात कोणताही सहभाग नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. ही सुटका केवळ भारत सरकारमुळेच झाली आहे. खान यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे यात म्हटले आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षित परतण्यामुळे शाहरुखला आनंद झाल्याचेही यात म्हटले आहे.