Shailja Murder Case: फेसबूकवर तिला पाहून मेजर पडला प्रेमात, जवळीक वाढवण्यासाठी पतीशी केली मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 02:02 PM2018-06-26T14:02:16+5:302018-06-26T14:02:28+5:30
दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीत गाजत असलेल्या शैलजा द्विवेदी हत्या प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेला मेजर हांडा याचे फारसे मित्र नव्हते. मात्र सोशल मीडियावर तो खूप अॅक्टिव्ह असायचा. त्याचदरम्यान त्याने फेसबूकवर शैलजाचा फोटो पाहिला आणि तो तिच्या प्रेमात पडला. मग शैलजा हिच्याची जवळीक करण्यासाठी तिच्या पतीसोबत त्याने मैत्री केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले की, 2015 साली मेजर निखिल हांडा याने शैलजा हिचा फोटो आपल्या कॉमन मित्राच्या टाइमलाइनवर पाहिला होता. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर तिच्याशी जवळीक करण्यासाठी हांडा याने शैलजाचा पती मेजर अमित द्विवेदी याच्याशी मैत्री केली. त्यानंतर हांडा याचे द्विवेदी यांच्या नागालँडमधील घरी येणे जाणे सुरू झाले. त्याचदरम्यान मेजर द्विवेदी यांना हांडा आणि त्यांच्या पत्नीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सापडला. संतापलेल्या मेजर द्विवेदी यांनी हांडा याला आपल्या घरी न येण्याची ताकीद दिली. मात्र नंतरही शैलजाशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरूच होते. मेजर अमित द्विवेदी आणि शैजला यांचा घटस्फोट व्हावा आणि शैलजासोबत आपल्याचा नवे जीवन सुरू करता यावे यासाठी तो प्रयत्नशील होता.
शनिवारी दुपारी बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर हा मृतदेह शैलजाचाच असल्याचं निष्पन्न झालं.