आता मीही रस्त्यावर झाडू मारु का? आमदार आणि मंत्र्यांवर संतापल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:42 AM2024-06-25T07:42:04+5:302024-06-25T07:48:34+5:30
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांवर आणि आमदारांवर संतापल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे २० दिवसांनी झालेल्या बैठकीत त्यांनी महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाणे आणि महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करणे ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा, असे स्पष्ट केले. पुढील वेळी तिकीट देताना अधिक छाननी होणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी
सीएम बॅनर्जी रिपोर्ट कार्ड पाहताना म्हणाल्या,'आज माझ्यावर बोलण्याची वेळ आहे आणि तुम्ही लोक फक्त ऐकाल.' मंत्री आणि विधाननगरचे आमदार सुजित बोस यांच्यावर कोलकाता येथील राजारहाटमध्ये अतिक्रमणांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यांनी हावडा आमदार आणि मंत्री अरुप रॉय आणि हावडा आमदार गौतम चौधरी यांच्यावर खंडणीचा आरोप केला. सीएम बॅनर्जी यांनी बल्ली नगरपालिकेच्या प्रशासक अमृता रॉय बर्मन यांनाही टोला लगावला.
सीएम बॅनर्जी म्हणाल्या, 'तुम्ही हाथीबागनची स्थिती पाहिली आहे का? मी शहर खूप सुंदर बनवले होते, पण आता नवीन ओसी आला आणि लगेच बेकायदेशीर काम केली. गरियाहाटमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे रस्त्यावर विक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिकचे शेड उभारले आहेत. पोलीस आणि अधिकारी सर्व काही पाहत आहेत, मात्र काहीच करत नाहीत. काही केवळ पैशासाठी काम करत आहेत.
...तर पक्षातून बाहेर काढले जाईल
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागतात? आता मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणे, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे, सर्व काही ठीक आहे, पण आधी जनतेचा विचार करा. तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबाबत त्यांनी म्हटले आहे की, जो कोणी खंडणी व चुकीच्या कामात सहभागी असेल त्याला पक्षातून बाहेर काढले जाईल.
कामगिरीच्या जोरावरच भविष्यातील निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाल्या. 'मला खंडणीचा मास्टर नको आहे. मला जनतेचे सेवक हवे आहेत. यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, विजेचा अपव्यय, पार्किंग रॅकेट, खंडणी आदी अनेक मुद्दे मांडले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा, हल्दिया आणि कूपर्स कॅम्पच्या अनेक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 'काही लोकांच्या चुकीच्या कृत्यांमुळे सरकारची प्रतिमा का मलीन व्हावी? जर मला चुकीचे काम होताना दिसत असेल तर तुम्हाला का दिसत नाही? रस्ते अस्वच्छ का आहेत? आता मला रस्त्यावर झाडू घ्यावा लागेल का?, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.