अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:06 PM2020-02-12T16:06:31+5:302020-02-12T16:06:49+5:30
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संजीव झा यांना 1 लाख 39 हजार 368 मते मिळाली. तर शैलेंद्र कुमार यांना 51 हजार 440 मते मिळाली.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने शानदार कामगिरी करताना तब्बल 62 जागा जिंकल्या. सलग तिसऱ्यांदा 'आप'ने दिल्लीत सत्ता मिळवली. तर भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघात भाजपला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
नितीश कुमार आणि अमित शाह यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातील त्यांच्या उमेदवारांना दिल्लीत सर्वात मोठ्या फरकराने पराभूत व्हावे लागले. या पराभवाची इतिहासात नोंद झाली आहे. बुराडी मतदार संघातून जनता दल युनायटेडचे उमेदवार शैलेंद्र कुमार यांना आम आदमी पक्षाच्या संजीव झा यांनी 88 हजार 188 मतांनी पराभूत केले. या निवडणुकीतील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
बुराडी मतदार संघात विजय मिळवण्यासाठी भाजप आणि जदयूने कसर सोडली नव्हती. विशेष म्हणजे शाह आणि नितीश कुमार यांनी या मतदार संघात संयुक्त सभा घेतली होती. एनडीएच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा जदयूला मिळाली होती. जदयूने येथून शैलेंद्र कुमार यांना संधी दिली होती. 2 फेब्रुवारी रोजी शैलेंद्र यांच्यासाठी शाह-नितीश कुमार यांनी जाहीर सभा घेतली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या झंझावातासमोर नितीश-अमित शाह यांच्या संयुक्त सभेचा निभाव लागला नाही.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संजीव झा यांना 1 लाख 39 हजार 368 मते मिळाली. तर शैलेंद्र कुमार यांना 51 हजार 440 मते मिळाली.