शनिशिंगणापूर विश्वस्तप्रश्नी शासनाला जाब विचारणार
By admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:11+5:302016-01-09T12:21:28+5:30
बाळासाहेब मुरकुटे: विश्वस्त मंडळ बरखास्तीची कार्यकर्त्यांची मागणी
बाळासाहेब मुरकुटे: विश्वस्त मंडळ बरखास्तीची कार्यकर्त्यांची मागणी
सोनई : शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदी चुकीच्या आणि पूर्वी गैरव्यवहार करणार्या मंडळींच्या कार्यकर्त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली, असा आरोप करीत ही निवडप्रक्रिया नेमकी कुठे अडखळली? विश्वस्तांची निवड करताना कोणते निकष लावले? या निवडप्रक्रियेत नेमके कोणते गौडबंगाल आहे, असा जाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना विचारणार आहे, असे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून हे देवस्थान राष्ट्रवादी काँंग्रेसच्या ताब्यात होते. देवस्थानचा पैसा खासगी शिक्षण संस्थेसाठी देणे, देवस्थानची रुग्णवाहिका, ट्रॅक्टर आदी वाहने वापरणे, भाविकांसह जनतेला देवस्थानच्या लाभापासून वंचित ठेवणे, असे आरोप पूर्वीच्या विश्वस्तमंडळावर होते. विशेष म्हणजे या आरोपांची चौकशी होऊन नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने पूर्वीच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप असल्याचे अहवालात म्हटलेले असतानाही देवस्थानवर चुकीच्या लोकांची निवड झालीच कशी? केंद्र व राज्यात भाजप-सेना आणि मित्रपक्षांची सत्ता असतानाही शिंगणापूर देवस्थान विरोधकांच्या ताब्यात जातेच कसे?, याची चौकशी करण्यात येऊन हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे.
स्व. बाबुराव बानकर आणि स्व. भाऊसाहेब शेटे यांच्या त्यागामुळे या देवस्थानची ख्याती विश्वभर पसरली. या दोघांनी स्वछ व पारदर्शी कारभार करीत पैसा जमवून देवस्थान वाढविले. मात्र या देवस्थानमध्ये गेल्या वर्षांत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन मुरकुटे म्हणाले, आम्हाला मानणारे बापूसाहेब शेटे, डॉ. रावसाहेब बानकर या दोघांना विश्वस्तपदाची संधी देऊन आ. मुरकुटे यांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा चुकीचा संदेश जनतेत पसरविण्यात आला. मात्र मी शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगतो, या निवडप्रक्रियेदरम्यान मी विरोधकांचे तोंडही पाहिलेले नाही. कोणाला पाच पैसेही मागितले नाहीत. याउलट माझा तुकाराम गडाख केला, असा संदेशही विरोधकांनी पाठविल्याचे सांगून मुरकुटे म्हणाले, विरोधकांनी मला राजकीयष्ट्या बदनाम केले असले तरी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना जाब विचारल्यानंतर सर्व स्पष्ट होईल.
महिलांच्या विश्वस्तपदाच्या समावेशाविषयी मुरकुटे म्हणाले, ही निवड स्वागतार्ह व भूषणावह आहे. महिला विश्वस्तांना भावी कार्यासाठी शुभेच्छा आहेत. शिवाजी शेटे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले. ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी शिंगणापूरला येऊन शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेऊन ही निवडप्रक्रिया खरोखरच पारदर्शी झाली का? तसे असेल तर राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही सुशिक्षित आणि सुसंस्कृत भाजपा-सेना विचाराच्या कार्यकर्त्यांना का डावलण्यात आले? असा सवालही त्यांनी केला. (वार्ताहर)
तर... मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना काळे झेंडे
या निवडप्रक्रियेत योग्य न्याय न मिळाल्यास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगत विश्वस्तांची ही निवड रद्द करण्याची मागणी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचाकडे केली.