हृदयविकाराच्या धक्क्याने शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन,राष्ट्रपती व पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:45 AM2018-03-01T01:45:03+5:302018-03-01T01:45:46+5:30
कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.
कांचीपूरम (तामिळनाडू) : कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती व पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.
गेल्या जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. कांची कामकोटी पीठाचे ते १९९४ मध्ये ६९ वे शंकराचार्य बनले. कांचीपीठाचे पुजारी म्हणून जयेंद्र सरस्वती यांची नियुक्ती झाली त्यावेळी अवघ्या १९ वर्षांचे होते. देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाºया विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते. कांचीपुरममधील वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४ मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी, २००५पर्यंत ते तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३ मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केले.
''सरस्वती यांच्या निधनाच्या वृत्ताने मला तीव्र वेदना झाल्या. आपले उदात्त विचार आणि अतुलनीय सेवेमुळे ते लक्षावधी भाविकांच्या हृदयात कायम राहतील. जयेंद्र सरस्वती यांनी गरजू आणि तळागाळातील लोकांची आयुष्ये सुधारण्यासाठी संस्थांची जोपासना केली व समाजाची सेवा करण्यासाठी ते आघाडीवर असायचे.''
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
''मोक्ष प्राप्त केलेले जयेंद्र सरस्वती यांना माझा प्रणाम. मानवतेच्या कल्याणासाठी आणि अध्यात्माच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतील.''
- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
''जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर मला दु:ख झाले. शंकराचार्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगभर त्यांना लक्षावधी अनुयायांकडून सन्मान मिळाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो.''
- राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष