“राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक बाबीत लुडबूड करु नये, PM मोदी...”; शंकराचार्य स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 02:06 PM2024-07-17T14:06:06+5:302024-07-17T14:06:42+5:30
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: ...तर आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू. गॅरंटी देतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला आहे, याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे जोपर्यंत पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुचींवर विराजमान होत नाही तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, अशी खंत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली होती. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर पुन्हा एकदा शंकराचार्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
मीडियाशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, राजकारणी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असतील, तर त्यांनी धर्माचे पालन करायला पाहिजे. धर्माचे मर्म जाणून घेऊन ते आचरणात आणणारेच खरे हिंदू असतात. धर्माचाऱ्याने वेळोवेळी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे, अन्यथा धर्माचाऱ्याने त्याचे काम केले नाही, असे होईल. म्हणून वेळोवळी धर्माची व्याख्या करत असतो, असे शंकराचार्यांनी सांगितले.
राजकारण्यांनीही विश्वासघातासारखे कार्य करणे योग्य नाही
माझे राजकारणाशी काही देणेघेणे नाही. पण राजकारण्यांनीही विश्वासघातासारखे कार्य करणे योग्य नाही. ज्यांनी उपकार केले, त्यांच्याच विश्वासघात करणे योग्य नाही. मी संन्यासी आहे. राजकीय भाष्य करणे टाळायला हवे, हे खरे आहे. परंतु, हाच नियम राजकीय पुढाऱ्यांना देखील लागू होतो. त्यांनीही धार्मिक बाबीत लुडबुड करता कामा नये, असे शंकराचार्य म्हणाले.
नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत
नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी आले त्यांनी नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. जर त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही त्यांची चूक दाखवून देतो. पंतप्रधान मोदी मंदिरात येऊन प्राणप्रतिष्ठा करू लागले, तर माध्यमे त्याचे थेट प्रक्षेपण करतात. जर शंकराचार्य मंदिर आणि धर्माबाबत बोलले तर तुम्ही आम्हालाच उलट शिकवता. राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे बंद करावे आणि गॅरंटी देतो की, आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू, असा शब्द शंकराचार्यांनी दिला.