Shivsena: शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे हेच माझे राजकीय गुरू, केसरकरांनी थेट सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:05 PM2022-07-13T19:05:01+5:302022-07-13T19:06:36+5:30
आज गुरुपौर्णिमा आहे, देशातील मोठे गुरू आणि माझे अध्यात्मिक गुरूंनी मला सल्ला दिल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले
मुंबई - शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून राज्यात कसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान सुरू आहे याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे एकीकडे सध्याच्या राजकारणात राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत केसरकर यांनी शिवसेनेतील बंडाचे राजकारण सांगितले. मात्र, राजकीय गुरू कोण, या प्रश्नावर आपसूकच त्यांनी शरद पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले.
आज गुरुपौर्णिमा आहे, देशातील मोठे गुरू आणि माझे अध्यात्मिक गुरूंनी मला सल्ला दिल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले. त्यानंतर, तुमचा राजकीय गुरू कोण, या प्रश्नावर त्यांनी हल्लीच्या काळात शरद पवार हेच माझे राजकीय गुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. मी राष्ट्रवादीत होतो तेव्हापासून ते माझे राजकीय गुरू आहेत. राज्याने यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांच्यासारखे मोठे नेते दिले. त्यानंतर, शरद पवार हेच हल्लीच्या काळातील मोठे राजकीय नेते आहेत. मी राष्ट्रवादीत असतानाही त्यांचा आदर करत, आजही करतो. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्यानंतर गुरूपौर्णिमेला मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या खुर्चीचे दर्शन घेतो. त्यामुळे, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच माझे राजकीय गुरू आहेत, असे दिपक केसरकर यांनी म्हटले. विशेष म्हणजे केसरकर हे सध्या एकनाथ शिंदे गटात असून ते राष्ट्रवादीला विरोध करत शिवसेनेतून बंड केलेले आमदार आहेत.
केसरकरांचा राष्ट्रवादीवर घणाघात
आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीची विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे, ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला. बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.