शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी यांना ‘लोकमत’ जीवनगौरव सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:56 AM2018-12-13T11:56:17+5:302018-12-13T11:56:23+5:30
शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांची निवड संसदीय कारकिर्दीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी झाली.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांची निवड संसदीय कारकिर्दीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी झाली आहे. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी या दोघांनी दिलेल्या योगदानामुळे लोकमत पार्लमेंट ज्युरी बोर्डाने त्यांची एकमताने निवड केली. हे दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात होते व प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले होते.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व भाजपाचे लोकसभा सदस्य निशिकांत दुबे यांची उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्युरी बोर्डाने निवड केली आहे. आझाद यांच्या कार्याचा राज्यसभेकडूनही सन्मान झाला होता. निशिकांत दुबे यांचे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवरील योगदान दिल्याबद्दल कौतुक झाले आहे. दुबे २००९ पासून सार्वजनिक जीवनात आहेत. ज्युरी बोर्डाने राज्यसभा व लोकसभेच्या चार महिला सदस्यांही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल निवड केली आहे. चित्रपटातून राजकारणात आलेल्या हेमामालिनी यांची निवड संसदेत व संसदेबाहेरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आहे.
रमा देवी यांची निवड लोकसभेच्या उत्कृष्ट महिला सदस्य म्हणून झाली आहे. हेमा मालिनी यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. रमा देवी तिसऱ्यांदा लोकसभेच्या सदस्य झाल्या आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून त्या बिहारमधून राष्ट्रीय जनता दलातर्फे बाराव्या लोकसभेत निवडून आल्या आहेत. त्या बिहार सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक) राज्यसभा सदस्य व दिवंगत नेते करुणानिधी यांच्या कन्या कणिमोळी यांची निवड उत्कृष्ट संसदपटू (राज्यसभा) म्हणून झाली आहे. कणिमोळी कवयित्री व पत्रकारही आहेत. छाया वर्मा यांची उत्कृष्ट नवोन्मुख संसद सदस्य (राज्यसभा) म्हणून झाली आहे. वर्मा प्रथमच सदस्य झाल्या आहेत. त्या रायपूरमधून काँग्रेसतर्फे राज्यसभेत २०१६ मध्ये बिनविरोध निवडून आल्या.
या आठ विजेत्यांना १३ डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सायंकाळी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील. लोकमत प्संसदीय पुरस्कारांची कल्पना लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांची आहे. हे पुरस्कार पहिल्यांदा २०१७ मध्ये विज्ञान भवनातील शानदार समारंभ देण्यात आले. यावर्षी पुरस्कारांसाठी जुलैमध्ये ज्युरी बोर्ड नक्की केले होते. त्याने आठ गटांतील विजेते निवडण्यासाठी मेहनत घेतली. आठ जणांची निवड करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ७८० सदस्यांच्या कामगिरीची छाननी केली.
केंद्रीय मंत्रिमंडळ व गेल्या वर्षीच्या विजेत्यांना यातून वगळण्यात आले. ज्युरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी होते व त्यांनी स्वत: जीवनगौरव पुरस्कारासाठी स्वत:चे नाव विचारात घेण्यास त्यांनी स्पष्ट विरोध केला. मात्र ज्युरी बोर्डाने त्यांचा विरोध अमान्य करून, त्यांची निवड केली. त्या चर्चेच्या वेळी डॉ. जोशी गैरहजर राहिले होते.