Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 07:14 AM2023-04-22T07:14:51+5:302023-04-22T07:18:51+5:30

Sharad Pawar: महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आणि चढउतारांचा कणखरपणाने सामना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या आजवरच्या सर्वात आव्हानात्मक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत

Sharad Pawar: Biggest crisis on NCP! Will Sharad Pawar defy the invisible pressure? | Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

googlenewsNext

- सुनील चावके
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आणि चढउतारांचा कणखरपणाने सामना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या आजवरच्या सर्वात आव्हानात्मक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच धक्का लावू पाहणाऱ्या या राजकीय गंडांतरातून ते नेहमीप्रमाणे तरुन जातील काय, यावर साशंक झालेल्या दिल्लीतील राजकीय वर्तुळाच्या नजरा खिळल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या बहुप्रतीक्षित निकालात दडलेल्या अनिश्चिततेमुळे शरद पवार, त्यांचे पुतणे अजित पवार तसेच त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचा हातमिळवणी करण्यासाठीचा अदृश्य स्वरूपातील दबाव वाढत चालला आहे. इंदिरा गांधींच्या काळात पक्षावरील आघात झेलून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहणारे पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीतील हे सर्वात मोठे संकट ठरले आहे. आपले राजकीय कौशल्य पणाला लावून ते दरदिवशी भाजपचे दडपण निकराने थोपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण सर्वस्व पणाला लावूनही पवारांना ही लढाई जिंकणे सोपे नाही, असे मत राजधानीतील राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. 

पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी शरद पवार यांनी भाजप, शिवसेना आणि काँग्रेससह अनेक छोटेमोठे पक्ष फोडले. पण आज पक्षांतरासाठी दोन तृतीयांश सदस्यांचा कायदा असूनही आपला पक्ष शाबूत ठेवण्यासाठी पवार यांना धडपडावे लागत आहे. पवारांच्या जागी पराभूताच्या मानसिकतेने राजकारण करणारे उद्धव ठाकरे असते तर त्यांचा पक्ष कधीचाच कोलमडून पडला असता. पण वयाच्या ८३ व्या वर्षीही पक्षातील सहकाऱ्यांची साथ नसतानाही शरद पवार आपले सारे राजकीय कौशल्य पणाला लावून अतिशय नेटाने खिंड लढवत असल्याबद्दल त्यांच्या जिद्द आणि चिकाटीची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रशंसा होत आहे. पण शरद पवार या दबावात किती वेळ तग धरून राहतील हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात आज २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती राहिलेली नाही. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता येण्याच्या ठोस शक्यतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निश्चिंत होते. म्हणूनच अजित पवार यांचे २३ नोव्हेंबर २०१९ चे बंड फसले. पण गेल्या वर्षी शिवसेना फुटून महाविकास आघाडी सत्तेतून गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे अवसान गळाले आहे.

कसा काढणार मार्ग
- केंद्रातील भाजप सरकारकडून ईडी, सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांचा सततचा ससेमिरा तसेच राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडून मतदारसंघांतील कामांसाठी निधीच्या बाबतीत होणारी अडवणूक बघता राष्ट्रवादीच्या आमदारांचा कल शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांच्याकडे झुकला आहे. अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आमदारांवर भाजपकडून दबाव वाढत चालला आहे.
- भाजपशी हातमिळवणी केल्याने ईडी, सीबीआयचा तगादा तर संपेलच, शिवाय दीड वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक खर्चाची बेगमीही होईल, अशा तडजोडीच्या मनःस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार पोहोचले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारे संकट परतावून लावण्यात पवार कितपत यशस्वी ठरतील, अशी शंका उपस्थित केली 
जात आहे.

Web Title: Sharad Pawar: Biggest crisis on NCP! Will Sharad Pawar defy the invisible pressure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.