शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 11:19 IST2024-12-18T11:16:25+5:302024-12-18T11:19:33+5:30
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली.

शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तब्बल ७० वर्षांनंतर देशाची राजधानी दिल्लीत होणारे ९८ वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानाच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल, अशी मला आशा असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी ‘सरहद’ या संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी डॉ. शैलेश पगारिया, अतुल बोकरिया, प्रदीप पाटील आणि लेशपाल जवळगे उपस्थित होते. ‘सरहद’ने अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत केले आहे. संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केले. पंतप्रधानांशी चर्चा होऊ शकली नाही. मात्र, उद्घाटन करणार याचे स्वीकृतीपत्र द्यावे, असे पंतप्रधानांच्या सचिवांसोबत बोलणे झाले, तर ७० वर्षांनंतर दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना केली.
पाच हजार लोकांची उपस्थिती
पवार यांनी आसन, निवास आणि भोजन व्यवस्था, व्हीआयपी गेट आदी गोष्टींच्या मुद्यावर आयोजकांशी विस्तृत चर्चा केली. साहित्य संमेलनाला जवळपास पाच हजार लोकांची उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तालकटोरा स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दुसऱ्या सभागृहाला अण्णाभाऊ साठे, मुख्य प्रवेश द्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, व्यासपीठाला काकासाहेब गाडगीळ, दुसऱ्या प्रवेश द्वाराला यशवंतराव चव्हाण नाव देण्यात आले आहे.