कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही, राजीनामा द्यावा - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 08:43 PM2018-05-19T20:43:01+5:302018-05-19T20:44:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या राज्यपालांवर टीका केली आहे.
बेंगळुरू - आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यामुळे कर्नाटकातील भाजपा सरकार कोसळले. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत येडियुरप्पा आणि राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शरद पवार म्हणाले की, ''आवश्यक बहुमताचा आकडा नसताही भाजपाने येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती. बहुमत नसतानाही येडियुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय म्हणजे संसदीय लोकशाहीवर आघात आहे. कर्नाटकाच्या राज्यापालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही. त्यांनी लोकशाहीवर उलटा आघातच केला. त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे''
कर्नाटकात सत्ता मिळवल्याबद्दल शरद पवार यांनी काँग्रेस आणि जेडीएसचे अभिनंदनदेखील केले. जेडीएसचे आमदार कुठल्याही आमिषाला न भुलता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत त्याबाबत काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे त्यांनी अभिनंदन केले.
कर्नाटक विधानसभेत 112 ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांनी जंग जंग पछाडलं. काँग्रेस-जेडीएस-बसपा एकत्र आल्यानं 104 वरून 112 पर्यंत मजल मारणं सोपं नव्हतं, पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांवर त्यांची मदार होती. राज्यपालांनी 15 दिवसांची मुदत दिल्यानं ते तसे निर्धास्त होते. पण, अचानक सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिला आणि त्यांची सगळीच गणितं बिघडली.
तरीही, आज सकाळपर्यंत भाजपाची, येडियुरप्पांची मोर्चेबांधणी सुरूच होती. पण दुपारी शपथविधी झाल्यानंतर मात्र त्यांच्या आशा मावळल्या. येडियुरप्पांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. विधानसभेचं कामकाज साडेतीन वाजेपर्यंत स्थगित झालं, त्यानंतर सगळंच चित्र बदललं आणि भाजपाने माघार घेतल्याचे संकेत मिळाले.