शरद पवार दिल्लीत पुन्हा चर्चेत
By admin | Published: July 22, 2016 03:42 AM2016-07-22T03:42:56+5:302016-07-22T03:42:56+5:30
ज्येष्ठ संसदपटू शरद पवार दोन कारणांमुळे या आठवड्यात प्रसिद्धीच्या झोतात राहिले.
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- ज्येष्ठ संसदपटू शरद पवार दोन कारणांमुळे या आठवड्यात प्रसिद्धीच्या झोतात राहिले. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (यू) अध्यक्ष नितीशकुमार बुधवारी स्नेहभोजनासाठी पवारांच्या निवासस्थानी गेल्यामुळे येथे चर्चेला उधाण आले असतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (एस) नेते एच.डी. देवेगौडाही त्यांच्यात सहभागी झाल्याने हे जेवण अधिक रुचकर बनले.
या तिघांमध्ये काय चर्चा झाली हे लगेचच समजू शकले नाही. निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये भाजपला नामोहरम करणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआला एकत्रित सामोरे जाण्याच्या व्यूहरचनेबाबत या त्रिकुटात ९० मिनिटे खल झाला. समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या मोहिमेवर असलेले नितीशकुमार तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करीत असून, शरद पवार या मोहिमेला पुढे नेण्यासाठी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहेत.
तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभोवती काय घडते आहे याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांपैकी नाहीत. आज त्यांनी राज्यसभेत पवारांच्या आसनापर्यंत जाऊन त्यांच्याशी कानगोष्टी केल्या. प्रश्नोत्तराच्या तासानंतर संसद सदस्य भोजनासाठी बाहेर पडत असतानाच मोदी आपल्या जागेवरून उठले आणि विरोधी बाकांकडे केले. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्याशी हस्तांदोलन करीत ते पवारांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याशी अल्पकाळ चर्चा केली.