पवार-मोदी भेटीमुळे तर्कांना उधाण; सहकारी बँकांवर नियंत्रणाबाबत पवार यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:09 AM2021-07-18T05:09:54+5:302021-07-18T05:11:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सकाळी दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र ही राजकीय भेट नव्हती असे भाजपने स्पष्ट केले आहे.

sharad pawar expressed grave concern on control over cooperative banks in pm modi meet | पवार-मोदी भेटीमुळे तर्कांना उधाण; सहकारी बँकांवर नियंत्रणाबाबत पवार यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

पवार-मोदी भेटीमुळे तर्कांना उधाण; सहकारी बँकांवर नियंत्रणाबाबत पवार यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

googlenewsNext

हरिश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची शनिवारी सकाळी दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र ही राजकीय भेट नव्हती असे भाजपने स्पष्ट केले आहे. देशापुढील महत्वाच्या विषयांवर मोदी व पवार यांच्यात चर्चा झाली, असे सांगण्यात आले.

या भेटीत काय चर्चा झाली हे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले नाही. मात्र पवार यांनी मोदी यांना दिलेले सहा पानी पत्र प्रसारमाध्यमांसाठी खुले करण्यात आले. सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला अनेक अधिकार देणारी दुरुस्ती केंद्र सरकारने बँक नियमन कायद्यात केली. त्याबद्दल या पत्रात पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दुरुस्तीमुळे सहकारी बँकांचे फारसे भले होणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी पवार यांनी मोदी यांना दाखविण्याकरिता काही कागदपत्रांची फाईल आपल्यासोबत नेली होती.

शरद पवार व पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीचे छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले. पण बैठकीचा विषय काय होता याबाबत काहीही माहिती दिली नाही. भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, पवार यांनी राजकीय खिचडी शिजवायला ठेवली आहे. पण ती सध्या तरी शिजताना दिसत नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय व ईडीने चौकशी सुरू केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला जोरदार विरोध केला नव्हता.

केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार हे नवे खाते निर्माण करण्यात आले असून, त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र विधानसभेने सहकार क्षेत्रासाठी याआधी काही कायदे तयार केले आहेत. या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा केंद्र सरकारला कोणताही अधिकार नाही, हा मुद्दा शरद पवार यांनी शनिवारी मोदींशी झालेल्या चर्चेत उपस्थित केला होता का, याबाबत माहिती मिळू शकली नाही. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व आहे.

मुख्यमंत्र्यांनाही भेटीची कल्पना दिली होती

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत आपण पंतप्रधानांची वेळ मागितली होती. त्यांनी शनिवारची वेळ दिली असून भेटीत सहकारी वित्तीय संस्थांबाबत केलेले बदल व अन्य विषयावर चर्चा करणार आहे. राज्याचे काही महत्त्वाचे विषय मी त्यांना सांगणार आहे. आपल्याला काही सुचवायचे तर सांगा, अशी चर्चा शरद पवार यांनी केली होती. भाजप आम्हाला आग्रह करत असताना आम्ही भाजपसोबत गेलो नाही. आता भाजपसोबत जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाल्याबाबत पवारांनी दिल्लीत आश्चर्य व नाराजी व्यक्त केली.

Web Title: sharad pawar expressed grave concern on control over cooperative banks in pm modi meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.