"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 09:08 AM2024-10-17T09:08:12+5:302024-10-17T09:28:54+5:30
सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आल्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar on Justice Statue: देशातील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन न्यायदेवतेच्या पुतळ्यावरील डोळ्याची पट्टी काढण्यात आली आहे. याशिवाय आता तलवारीऐवजी एका हातात संविधान ठेवण्यात आले आहे. जेणेकरून देशातील कायदा आंधळा नाही असा संदेश देता येईल. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. हा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात आला आहे. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या डोळ्यावर पट्टी नाही आणि हातात तलवारीऐवजी संविधान आहे. तसेच एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान ठेवण्यात आलं आहे. देशातला कायदा आंधळा नाही आणि तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारीत आहे, असा संदेशही नव्या पुतळ्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा पुतळा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी बसवला आहे.
या नव्या पुतळ्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी बोलताना कौतुक केलं आहे. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते. "या पुतळ्यातून सरन्यायाधीशांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात कधी झाला नव्हता तो त्यांनी केला," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, न्यायदेवतेच्या डोळ्याभोवती बांधलेल्या पट्टीचा विशेष अर्थ होता. डोळ्यावर पट्टी कायद्यासमोर समानता दर्शवते. याचा अर्थ कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. यामध्ये ना ज्याच्याकडे पैसा आहे त्याला महत्त्व दिले जाते ना पद, सत्ता आणि पद याला महत्त्व दिले जाते. न्यायालय त्यांच्यासमोर हजर होणाऱ्यांची संपत्ती, सत्ता आणि दर्जा पाहत नाही. तर त्यांच्या हातातील तलवारीचे महत्त्व इतकेच आहे की, कायद्यात गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे अधिकार आहेत.
न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात आलेला नवीन पुतळा पांढरा रंगाचा आहे. या पुतळ्याने भारतीय पोशाख - साडी परिधान केली आहे. तिच्या डोक्यावर एक मुकुट देखील आहे. पौराणिक कथांमध्ये ज्याप्रमाणे देवींच्या डोक्यावर मुकुट असल्याचे वर्णन केले आहे तशा पद्धतीने. कपाळावर टिकली देखील आहे. तिने दागिनेही घातले आहेत. त्याच्या एका हातात पूर्वीसारखा तराजू आहे, पण दुसऱ्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे.